तुळजापूर

अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासन हस्तांतरित करणे बाबत मा. मुख्यमंत्री यांना भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने निवेदन.

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी
.
आज श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर, हे महाराष्ट्र शासना हस्तांतरित करणे बाबत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननिय श्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर ची स्थापना 19 सप्टेंबर 1983 साली करण्यात आली आहे. उस्मानाबाद चे मा. जिल्हाधिकारी साहेब हे या महाविद्यालयाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. सदरील महाविद्यालय हे पदवी अभ्यासक्रम (स्थापत्य, यांत्रिकी, अनुवैजिक व दूरसंचार तसेच संगणक शास्त्र अभियांत्रिकी), पदविका अभ्यासक्रम (स्थापत्य, मेकॅनिकल अभियांत्रिकी आणि ईटीसी), इत्यादी अभ्यासक्रम चालविले जातात. वरील सर्व शाखांची प्रवेश क्षमता १५७२ आहे. महाविद्यालयास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, तंत्रशिक्षण संचलनालय, मुंबई यांची मान्यता असून, महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारे यांच्याशी संलग्नित आहे.

मराठवाड्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद व श्री. गुरूगोविंदसिंह अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड या महाविद्यालयांचे रूपांतर स्वायत्त संस्थेमध्ये झाल्यामुळे मराठवाडा विभागातील विद्यार्थ्यांच्या हक्काच्या ७०% कोट्यातील जागा कमी झालेल्या आहेत. यामुळे मागासलेल्या मराठवाड्याचा शैक्षणिक अनुशेष वाढून या प्रांतातील विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे.

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय हे गेल्या 37 वर्षांपासून उच्च अध्यापनाची परंपरा असलेले व विविध शाखेतील सुमारे सहा हजार अभियंते घडवणारे त्याचबरोबर शासनाच्या नियमाप्रमाणे फी साकारून या भागातील गोर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयांमध्ये विभाग निहाय इमारती व ग्रंथालय क्रिडांगण तसेच मुलांचे व मुलींचे सुसज्ज वस्तीगृह असणारे हे परिपक्व महाविद्यालय आहे.

माननीय मंत्री महोदयांनी या प्रस्तावास अनुकूलता दर्शविली असता मराठवाडा व मराठवाड्यातील इतर ग्रामीण भागातील गोर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची शासकीय शुल्कामध्ये तांत्रिक शिक्षणाची सोय होऊन या भागाचा शैक्षणिक विकास होण्यासाठी फार मोठा हातभार लागणार आहे. त्याचबरोबर मराठवाड्याचा शैक्षणिक अनुशेष कमी होऊन लोकाभिमुख व प्रगतशील महाराष्ट्र शासनाच्या लौकीकामध्ये भर पडणार आहे.

अशा विविध कारणांमुळे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापुरचे शासनास हस्तांतरित करणे बाबतचा प्रस्ताव मंजूर करून महाविद्यालयाचे महाराष्ट्र शासनाने अधिग्रहण करावी अशी विनंती भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाप्रमुख मा. विकास भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख मा. जगन्नाथ गवळी, शहर प्रमुख सुधीर क़दम,शाम पवार, युवासेनेचे तालुकाप्रमुख मा. प्रतीक रोचकरी, शहरप्रमुख सागर इंगळे, लखन कदम, बापूसाहेब नाईकवाडी यांच्यासह अनेक शिवसैनिक मित्र परिवार उपस्थित होता.

Related posts