तुळजापूर

दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांना मदत जाहीर करू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी,

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करु, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मंत्रीमंडळ बैठक घेऊन मदतीचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

“महाराष्ट्र मला नवीन नाही. यापूर्वी जेव्हा आलो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. तुमच्या वेदना, व्यथांना आवाज देण्याचं काम मी तेव्हा करत होतो. माझं कर्तृत्व शून्य आहे, पण तुमच्या आशिर्वादामुळे मुख्यमंत्री झालो आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, “आजची परिस्थिती भयानक आहे. आपण संकटाता सामना केला नाही असं काही नाही. वर्षाची सुरुवातच जागतिक संकटाने झाली आहे. बाहेर पडू म्हणताच निसर्ग वादळ आलं आणि जाता जाता पावसाने तडाखा दिला”.

“आम्ही परिस्थितीचा अंदाज घेत आहोत. अतिवृष्टी होण्याच धोका कमी झाला आहे. पण पुढील सात ते आठ दिवस वातावरण बिघडू शकतं असं हवामान विभागाने सांगितलं आहे. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणाऱ्यातला मी नाही. जे बोलतो ते मी करतो, पण करू शकत नाही असं बोलत नाही. तुम्ही सर्वजण मला ओळखता. तुम्हाला बरं वाटावं, टाळ्या वाजवाव्यात यासाठी आकडा जाहीर करणार नाही.

तुम्ही माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहात.सवंग लोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही.मी जे बोलतो ते करतो पण जे करू शकत नाही ते बोलणार नाही तुम्हाला बरं वाटावं तुम्ही टाळ्या वाजवत म्हणून मी आकडा घोषित करायला आलेला नाही तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे तुम्हाला जास्तीत जास्त ताकद द्यायला आलो आहे. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

*मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाद्वार बाहेरुन घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन*

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. २१ रोजी पाचव्या माळे दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाद्वार बाहेरुन श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची यथासांग पुजा, आरती करुन दर्शन घेतले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्रावरील संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगावरचे संकट दुरु होवू दे, महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट टळल्यावर पुन्हा तुझ्या दरबारात दर्शनासाठी येणार, तसेच निसर्गच्या अवकृपेमुळे आलेले बळीराजावरचे संकट दुर होवू दे, माझ्या बळीराजा शेतकऱ्यांना या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ताकद दे, असे साकडे श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात माथा टेकवून घातले. या वेळी त्यांचे पारंपरिक पुजारी कुमार डिंगबराव इंगळे यांनी उद्वव ठाकरे यांची यथा सांग पुजा करुन आशीर्वाद दिला.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख,खासदार ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख मा. शंकरराव बोरकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश सोमाणी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी तसेच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकार,पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन तहसीलदार तांदळे साहेब यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी, शिवसैनिक पदाधिकारी, शिवसैनिक बांधव व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related posts