साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे तुळजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या अतिवृष्टीमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे गावांमध्ये देखील पाणी घुसूनतालुक्यातील अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. या सर्व प्रकारच्या झालेल्या नुकसानीची पाहणी काल तुळजापूर तालुक्यातील कात्री-अपसिंगा येथे खा. छ.संभाजीराजे भोसले यांनी केली.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेल्या अनेक पिकांना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मुकावे लागले आहे. सोयाबीन सारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासोबतच ऊस, कांदा, द्राक्ष, यांसारख्या बागायती शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कित्येक ठिकाणी ऊस आडवे झाले आहेत. अनेक ठिकाणी कांदा पीक वाहून गेले आहे. तालुक्यातील नदी/ओढे काठच्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या अतिवृष्टीमुळे घासून गेल्या आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी सोयाबीन चे आलेले पीक हे बुचाड लावून ठेवले असता ते सर्व अख्खे बुचाड सहित वाहून गेले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी घुसल्याने विविध प्रकारच्या जीवित व वित्त हानीला जनतेला तोंड द्यावे लागते आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली आहे. अशा विविध प्रकारच्या नुकसानीचा सामना लोकांना करावा लागत आहे.
अशा सर्व प्रकारच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर छ. संभाजीराजेंनी जनतेला मानसिक आधार दिला. तसेच नुकसानग्रस्त नागरिकांनी खचून न जाता धीर धरून संकटाचा सामना करण्याचे आवाहन जनतेला केले. लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी होतील ते प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
भेटीदरम्यान अपसिंगा ग्रामपंचायत च्या वतीने ग्रा. पं. सदस्य मा. अमिरभाई शेख यांनी खा. छ संभाजीराजे भोसले यांचा सत्कार केला. यावेळी जि. प. सदस्य धीरज पाटील, सज्जनराव साळुंखे, ग्रा. पं. सदस्य अमिरभाई शेख यांच्यासह अनेक गावकरी व शेतकरी बांधव उपस्थित होते.