पंढरपूर,
: गेल्या चार-पाच दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांची पडझड झाली आहे. नुकसानभरपाई पासून एकही शेतकरी व नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून, वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिवृष्टीमुळे पंढरपूर तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांची व चंद्रभागा नदीवरील येथील कुंभारघाट येथे भेट देवून पाहणी केली. कुंभारघाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे मरण पावलेल्या अभंगराव कुंटुबियांच्या नातेवाईकांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यानी घेतली.
यावेळी आमदार भारत भालके, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, महावितरणचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, पांटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, महावितरणचे एच.पी कासार आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाल्यामुळे महाराष्ट्रात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे व घरांचे तातडीने पंचनामे करावेत. पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सुरु असलेल्या घाटांचा तसेच इतर कामांचा दर्जा व गुणवत्ता चांगली राहिल, याबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.घाट बांधकामाबाबत चौकशी करुन दोषी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सुरु असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांबाबत लवकरच पुणे येथे बैठक घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.यावेळी चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे मरण पावलेल्या अभंगराव कुंटुबियांच्या नातेवाईकांची भेट घेवून शासनाच्या वतीने आवश्यकती मदत देण्यात येईल तसेच केंद्र शासनाकडे नुकसानग्रस्त पिकांच्या भरपाईसाठी निधी मागणीसाठी प्रस्ताव पाठण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले .
नुकसानग्रस्त शेतकर्यांची भेट –
पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली, कासेगांव येथील गावांना भेट देवून नुकसानग्रस्त पिकांची तसेच पुरग्रस्त भागांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली . यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सरसकट पिकांचे पंचनामे करावेत, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. पटवर्धन कुरोली येथे शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधून नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगितले. अतिवृष्टीमुळे तसेच भीमा नदीला पुरआल्यामुळे अनेक नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलेल्या असतो, यासाठी आवश्यक तेथे पुल बांधणी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. महापुरामुळे नदीकाठचे वीज रोहित्रे, वीजेचे पोल, पाण्यात वाहून गेल्यामुळे नदी काठच्या गावांची वीज खंडीत झाली आहे. महावितरण कंपनीने तात्काळ अधिकचे कर्मचारी उपलब्ध करुन वीजपुरवठा पुर्ववत करावा, अशा सुचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.