तुळजापूर

शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई मदत मिळणे बाबत मा. ना.पालकमंत्री यांना तुळजापूर शिवसेनेचे निवेदन.

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे तुळजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या अतिवृष्टीमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे गावांमध्ये देखील पाणी घुसूनतालुक्यातील अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. या सर्व प्रकारच्या झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना व जनतेला मिळावी यासाठी धारशिवचे खासदार मा. ओमराजे निंबाळकर व धारशिवचे शिवसेना तालुकाप्रमुख मा. सतीश सोमाणी यांच्या उपस्थितीत, तुळजापूर चे शिवसेनेचे तालुकाप्रमुख, मा. जगन्नाथ गवळी यांनी तुळजापूर शिवसेनेच्या वतीने धारशिवचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे मृदा व जलसंधारण मंत्री मा. ना. शंकरराव गडाख साहेब यांना निवेदन दिले..
तालुक्यातील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेल्या अनेक पिकांना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मुकावे लागले आहे. सोयाबीन सारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासोबतच ऊस, कांदा, द्राक्ष, यांसारख्या बागायती शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कित्येक ठिकाणी ऊस आडवे झाले आहेत. अनेक ठिकाणी कांदा पीक वाहून गेले आहे. तालुक्यातील नदी/ओढे काठच्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या अतिवृष्टीमुळे घासून गेल्या आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी सोयाबीन चे आलेले पीक हे बुचाड लावून ठेवले असता ते सर्व अख्खे बुचाड सहित वाहून गेले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी घुसल्याने विविध प्रकारच्या जीवित व वित्त हानीला जनतेला तोंड द्यावे लागते आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली आहे. अशा विविध प्रकारच्या नुकसानीचा सामना लोकांना करावा लागत आहे.

तरी मा. मंत्रीमहोदय यांनी संबंधित यंत्रणेला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासकीय मदत व आधार द्यावा अशा प्रकारच्या मागण्या पालकमंत्री मा. शंकरराव गडाख याना तुळजापूर शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या.


धारशिवचे खा. मा. ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत पालकमंत्री शंकरराव गडाख यांना निवेदन देताना तुळजापूर शिवसेनेचे तालुकाप्रमुख मा. जगन्नाथ गवळी व धाराशिव तालुकाप्रमुख मा. सतिशकुमार सोमाणी यांच्यासह अनेक शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

यावेळी धारशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, धारशिवचे तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमानी, ग्रा प सदस्य आमीर शेख, उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, चेतन बंडगर, बालाजी पांचाळ, सिद्राम कारभारी, यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related posts