उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाई पोटी केंद्र सरकारने भरीव मदत करावी; कळंब-उस्मानाबाद चे आ. मा. कैलास पाटील यांची पथकाकडे मागणी.
साईनाथ जगन्नाथ गवळी
उस्मानाबाद (धाराशिव)
जिल्हा प्रतिनिधी,
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे व पुराच्या पाण्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतीसह पिके, फळबागा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच अनेक ठिकाणी जनावरे दगावली होती तर काही घरांची पडझड झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
कात्री ता.तुळजापूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने पाहणी केली. यांच्यासह पाहणी करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच जमीनीचे नुकसान झालेल्या शेतजमिनीच्या दुरूस्तीसाठी केंद्र सरकारच्या एनडीआरएफच्या व प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत नियमांचे निकष बदलून जमिनी दुरुस्ती व जमिनीच्या मशागतीसाठी भरीव मदत करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलासदादा पाटील यांनी या पथकाकडे केली आहे.
पाहणी दरम्यान पथकातील अधिकारी वर्गाला मा. कैलास पाटील यांनी वस्तुस्थिती मांडून नुकसानीची माहिती दिली. बहुभुधारक शेतकऱ्यांच्या जमिनीचे भुस्कलन झालेले असून केंद्राच्या जाचक अटीमुळे त्यांना मदत मिळालेली नाही. यामुळे हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले असून त्यातही केंद्र सरकारने विमा कंपन्यांनी वैयक्तिक पंचनामे ग्राह्य धरून तसेच ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पंचनामा करणे शक्य झाले नाही त्यांच्यासाठी महसूल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व विमा कंपन्यांना तसे आदेशीत करावे अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी कळंब-धारशिवचे आ. कैलास पाटील, केंद्रीय ग्रामविकास खात्याचे उपसचिव श्री. यशपाल, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार श्री. आर.बी.कौल, मुख्य अभियंता श्री. तुषार व्यास, अधीक्षक अभियंता श्री. महेंद्र सगरे, विभागीय सह आयुक्त श्री. अविनाश पाठक, जिल्हाधिकारी श्री.कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, निवासी उपजिल्हाधिकारी श्री.शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी श्री.योगेश खरमटे, कृषी अधीक्षक श्री.उमेश घाडगे, तहसीलदार सौदागर तांदळे, धाराशिव शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी तसेच कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.