33.9 C
Solapur
February 21, 2024
महाराष्ट्र

मार्चमध्ये १० हजार १११ बेरोजगारांच्या हाताला काम – नवाब मलिक

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांद्वारे राज्यात मार्च २०२१ मध्ये १० हजार १११ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.
अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर या वर्षात जानेवारी ते मार्चअखेर ४३ हजार ९१० बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मलिक यांनी सांगितले.
कौशल्य विकास मंत्री मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते

Related posts