राज्यात १५ दिवसांची संचारबंदी जाहीर करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. राज्यात एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना लसींचा तुटवडा हा गंभीर मुद्दा आहे. महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. पत्रामधून राज ठाकरे यांनी मोदींसमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली आहे. तसंच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण करावं तसंच खासगी संस्थांनाही लस खरेदीची परवानगी दिली जावी अशी मागणीही त्यांनी मोदींकडे केली आहे.
राज ठाकरे यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात करोनाची दुसरी लाट भयंकर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी लॉकडाउन आणि निर्बंध लावणं हा उपाय नाही असं मत व्यक्त केलं आहे. तसंच महाराष्ट्राला १०० टक्के लसीकरण करण्याची गरज असल्याचं सांगताना त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करु द्यावं अशी पहिली मागणी केली आहे.
तसंच राज्यातील खासगी संस्थांना लस खरेदी करता यावी अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. यासोबत सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियम पाळून लसविक्रीची परवानगी द्यावी, लसींचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी इतर खासगी संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्याची मुभा दिली जावी तसंच करोनावरील उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधं उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.अशी मागणीही राज ठाकरे यांनी पत्रात केली आहे.
राज ठाकरेंचं मोदींना पत्र
“कोविडची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असातना महाराष्ट्रातली स्थिती सर्वात बिकट झाली आहे,” असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
सर्व वयोगटातील लोकांचं लसीकरण
“करोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर १०० टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे व कळीची आहे. म्हणूनच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्टं ठेवून, राज्यातील सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ हवीच,” असंही त्यांनी म्हटलं आहे.