(सोलापूर जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी यांना दिले श्री.पाटील यांनी निवेदन)
पंढरपूर प्रतिनिधी: कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लादलेले आहेत.याचाच एक भाग म्हणून काल सोलापूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सोलापूर शहर व जिल्ह्यात लाॅकडाऊन घोषित झाल्याने जिल्ह्यासोबतच पंढरपूरातील व्यासायिक निराश झाला आहे.आगोदरच तो कसाबसा सावरत असताना पुन्हा लॉकडाऊन घोषित केल्याने सर्वच व्यवसाय ठप्प होणार आहेत त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यापा-यांची बाजू मांडण्यासाठी ती दुकाने खुली करावी याकरिता श्री. अभिजीत पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लॉकडाऊनमुळे पंढरपूरातील ढासळलेल्या व्यवसायिक परिस्थितीची सविस्तर माहिती दिली व निवेदन सादर केले .
सध्या पंढरपूरातील हेअर सलून,टपरी धारक, चहा कॅन्टीन, पानटपरी, खेळणी दुकान, कापड दुकान, भांडी दुकान, बाजार,भाजी मार्केट, हाॅटेल रेस्टॉरंट, ब्युटी पार्लर, इत्यादी सर्व दुकाने सुरू करावीत अशी मागणी या निवेदनात केली तसेच लग्न समारंभासाठी मंगल कार्यालयास ५० ऐवजी २००लोकांना परवानगी देण्यात यावी याबाबतचे निवेदन दिले. सर्व व्यावसायिक व्यापाऱ्यांचा या लाॅकडाऊनला विरोध आहे.त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून हे निवेदन दिले.यावेळी प्रशासनाच्यावतीने शासनस्तरावर आपले निवेदन वरिष्ठ विभागाला पाठवून योग्य तो सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करू असे अश्वासन यावेळी पाटील यांना मिळाले.
सध्या सर्वच दुकानांचे अर्थकारण बिघडले असताना व्यावसायिकांनी घेतलेले कर्ज व त्यांचे हप्ते थकीत असताना मार्च मध्ये लाईट बिल, नगरपालिका कर यासाठी तगादा लावल्यामुळे हे बिल लवकर भरण्यासाठी नवीन कर्ज काढले आहे.नवीन कर्जाच्या डोंगराबरोबरच दुकानातील कर्मचाऱ्यांचे पगार, दुकानाचा खर्च, घरप्रपंच,दैनंदिन रोजीरोटीचा मासिक खर्च सुद्धा भागविणे अशक्य होत आहे. हा खर्च भागवण्यासाठी सुद्धा कर्जच काढावी लागत आहे. त्यामुळे हे व्यापारी तिहेरी कर्जात अडकले असताना हा नवीन लाॅकडाऊन व्यापाऱ्यांसाठी अस्मानी संकट ठरणार आहे.
आपल्या राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या एक वर्षापासून आहे. गतवर्षी करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांना तसेच व्यापारी, शेतकरी यांना फार मोठे आर्थिक,मानसिक नुकसान सोसावे लागले आहे.त्यामुळे लवकरात लवकर नवीन निर्बंध लागू करून सदर लॉकडाऊन मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली.