पंढरपूर

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील चुरस वाढली – राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या भूमिकेकडे लक्ष !

दि.१९ नोव्हेंबर रोजी पंढरपुरात बैठकीचे आयोजन – प्रा.सुभाष माने (मुख्याध्यापक महामडळचे, अध्यक्ष)

पंढरपूर :
पुणे शिक्षक मतदारसंघात नेहमीच निर्णायक भूमिकेत असलेल्या राज्य मुख्याध्यापक महामंडळाने अद्याप आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नसली, तरी याच अनुषंगाने महामंडळाची येत्या 19 नोव्हेंबर रोजी पंढरपुरात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पुणे विभागातील सुमारे 500 हून अधिक मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित राहणार आहेत,त्या बैठकीमध्ये सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेऊ अशी माहिती राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष प्रा. सुभाष माने यांनी संगितले. त्यामुळे मुख्याध्यापक महामंडळाच्या होणार्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

2014 साली महामंडळाचे अध्यक्ष प्रा. सुभाष माने यांनी पुरोगामी शिक्षक लोकशाही आघाडीतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये प्रा. माने यांना प्रथम पसंतीची 3 हजार तर दुसऱ्या पसंतीची तब्बल 12 हजार मते मिळाली होती. या निवडणुकीत आमदार सावंत यांना पहिल्या पसंतीची 6200 तर भगवान साळुंखे यांना 5900 मते मिळाली होती. तिरंगी लढतीमध्ये आमदार सावंत यांनी बाजी मारली होती. गेल्या निवडणुकीत आमदार सावंत यांना सोलापूरसह अन्य जिल्ह्यांतील काही मातब्बर राजकीय नेत्यांचा आशीर्वाद मिळाला होता.

गुरुवारी (ता. 12) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार सावंत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. महाविकास आघाडीने जयंत आसगावकर यांना तर भाजपने जितेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे.

विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना आघाडीची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती; परंतु कॉंग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार दिल्याने आमदार सावंतांची चांगलीच अडचण झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने शिक्षक मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने आमदार सावंतांना फार मेहनत घ्यावी लागणार आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मुख्याध्यापक महामंडळाने भूमिका जाहीर करण्यासाठी 19 नोव्हेंबर रोजी पंढरपुरात बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाचे पदाधिकारी कोणती भूमिका घेतात, यावर ही तिन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Related posts