सचिन झाडे
पंढरपूर (प्रतिनिधी) :
प्रत्येक वर्षी साधारणतः १४ जानेवारी रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. याबरोबरच वातावरणात अनेक बदल होतात. म्हणून या दिवशी एकमेकांना स्वादिष्ट आणि पौष्टिक असे तिळगूळ देऊन प्रेमाची देवाण घेवाण होते. तसेच सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींना स्नेह भेट देऊन एकमेकींच्या आनंदात सहभागी होतात. या रुढी परंपरेबरोबरच एक ते पाच वयोगटातील बालकांना बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे.
या रुढी परंपरेला अनुसरून सदोदित सामाजिक कार्यात सहभागी असणारे श्री. व सौ. सविता रवि सोनार आणि कुटुंबिय यांनी येथील पालवी या सामाजिक संस्थेतील एक ते पाच वयोगटातील अकरा बालकांना बत्तासे, सकस पौष्टिक तिळगूळ लाडू, स्वादिष्ट हलवा, शरीरात उर्जा निर्माण करणारे शेंगदाणे, प्रोटीनयुक्त कोवळे लुसलुशीत डहाळे, डोळ्यांच्या दृष्टीस बळकटी देणारे गाजर, प्रतिकार शक्ती वाढविणारे व्हिटॅमिन सी युक्त देशी गावरान बोरे तसेच खमंग कुरकुरीत चुरमुरे अशा वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थाच्या संयुक्तिक मिश्रणाने न्हाऊ घातले.
“मकरसंक्रांतीच्या या परंपरेमुळे बालकांना विविध खाद्य पदार्थांची चव तर कळतेच शिवाय वातावरणात होणाऱ्या बदलास सामोरे जाण्यासाठी आवश्यक ते पोषक घटक मिळतात.” असे सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी यावेळी सांगितले.
वेगवेगळे सण आणि उत्सव साजरे करत असताना सामाजिक भान ठेवून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या श्री. व सौ. सविता रवि सोनार यांच्या स्वतः च्या घरी सण उत्सव साजरा करतानाच पालवी या सामाजिक संस्थेतील अकरा बालकांना बोरन्हाण घालून रुढी परंपरा तर जपलीच आहे. शिवाय पालवी या सामाजिक संस्थेतील बालकांना स्वादिष्ट, सकस आणि पौष्टिक असे वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा खाद्यपदार्थांची मेजवानीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
श्री.व सौ. सविता रवि सोनार आणि कुटुंबियांच्या माध्यमातून केलेल्या या अनोख्या सामाजिक उपक्रमामुळे पंढरपूर आणि परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पारंपरिक कार्यक्रमावेळी मा. मंगलताई शहा, कवी सचिन कुलकर्णी, मा. डिंपलताई घाडगे आणि पालवीतील मुले मुली उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेवती सोनार आणि ओंकार सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले.