24.2 C
Solapur
September 26, 2023
पंढरपूर

प्रहार अपंग क्रांती संघटनेचा प्रशासनाविरोधात एल्गार. विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.

सचिन झाडे
पंढरपूर / प्रतिनिधी 

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने पंढरपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे होत असलेल्या विलंबाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने अनेक वेळा दिव्यांगांच्या विविध मागण्यांबाबत निवेदने देऊन. आंदोलने करूनही स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने अखेर बुधवारी प्रहार संघटनेच्या वतीने पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करून प्रशासना विरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे.

या आंदोलनात संघटनेच्यावतीने नगरपालिका वार्षिक वसुली पैकी अपंगांना पाच टक्के निधी तात्काळ मिळावा, ग्रामपंचायत पैकी पाच टक्के निधी तात्काळ खात्यावर वर्ग करण्यात यावा, संजय गांधी योजनेचा वेळेत न भेटणारा निधी वेळेवर बँक खात्यावर जमा करण्यात यावा, अपंगांना अंत्योदय योजनेत समावेश करून त्यांना पिवळे रेशन कार्ड देण्यात यावे, शासकीय कार्यालये, बॅंका इत्यादी कार्यालयांमध्ये अपंगांच्या सोयीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. आदी मागण्यांचे निवेदन घेण्यात आले आहे.

यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हा सचिव संजय जगताप, तालुकाध्यक्ष दत्तात्रय चौगुले, शहराध्यक्ष गणेश ननवरे, संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर गायकवाड, विद्यार्थी संघटनेचे योगेश बारसकर आदी उपस्थित होते.

Related posts