सचिन झाडे
पंढरपूर–
सध्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता अभियांत्रिकीसह अन्य प्रवेश प्रक्रिया सुरु असून केवळ कागदपत्राच्या विलंबामुळे विद्यार्थी व पालक यांची तारांबळ उडत असल्याने विद्यार्थी व पालकांनी कागदपत्रे पूर्ततेसाठी कालावधी वाढविण्याची मागणी केली होती. त्याला राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने हिरवा कंदील दाखवला असून आता ई. डब्ल्यू. एस., नॉन क्रिमिलेअर अथवा जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास दि. २०/०१/२०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये तंत्रशिक्षणा अंतर्गत येणाऱ्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रवेश घेणारे उमेदवार व पालक यांच्या लेखी व तोंडी निवेदनानुसार EWS मूळ प्रमाणपत्र, NCL मूळ प्रमाणपत्र, मूळ जात पडताळणी प्रमाणपत्र (CVC) सादर करण्याकरीता दि. २० जानेवारी २०२१ रोजी पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. वरील कालावधीत पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व उमेदवारांनी दि. २० जानेवारी २०२१ पर्यंत स्वतःच्या लॉगिन मधून ऑनलाइन पद्धतीने मूळ प्रमाणपत्र सादर करावी. जे उमेदवार मूळ प्रमाणपत्र दि. २० जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करणार नाहीत अशा उमेदवारांचा प्रथम फेरीतील प्रवेश रद्द करून त्यांना दुसऱ्या फेरी करता खुल्या वर्गातून पात्र ठरविण्यात येईल. ज्या उमेदवारांनी वरील तीन प्रमाणपत्राकरीता अर्ज केल्याची पावती ऑनलाईन अर्ज करताना सादर केलेली आहे अशाच उमेदवारांना ही मुदतवाढ देण्यात येत आहे.
तसेच पुढील सुधारीत वेळापत्रक दि. १८ जानेवारी २०२१ नंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर (www.mahacet.org) प्रसिद्ध करण्यात येईल असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबईचे आयुक्त यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या अभियांत्रिकी प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी (९८६०१६०४३१), स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८), प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे (९५४५५५३८७८), प्रा. मनोज देशमुख (९९७०२७७१५०), प्रा. उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.