पंढरपूर

वारी कालावधीत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना

पंढरपूर, दि. 23:
कार्तिक वारी ही कोरोनाच्या संकटकाळात तसेच आचारसंहितेच्या कालावधीत पार पडत आहे. यात्रा कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. या कालावधीत शहरात गर्दी होणार नाही तसेच बाहेरुन भाविक येणार नाहीत याची दक्षता संबधितांनी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या.

कार्तिक वारी नियोजनाबाबत शासकीय निवासस्थान पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,प्रांताधिकारी सचिन ढोले, शमा पवार, उदयसिंह भोसले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी,उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस उपअधिक्षक दत्तात्रय पाटील, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. या वारी कालावधीत चंद्रभागा स्नान करुन कळसाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरात येतात. यासाठी दिनांक 21 नोव्हेबर ते 01 डिसेंबर 2020 पर्यंत चंद्रभागा स्नान करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. खाजगीवाले यांच्या रथोत्सावाची मिरवणूक नगरप्रदक्षिणा मार्गावरुन साध्या पद्धतीने व सामाजिक अंतराचे पालन करुन काढण्यात येईल याची दक्षता घ्यावी.

शहरात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी दिनांक 24 नोव्हेबर च्या रात्री 12.00 वाजलेपासून ते 26 नोव्हेंबरच्या रात्री 12.00 वाजेपर्यत पंढरपूर शहर व शहरालगतच्या 11 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. मठामध्ये बाहेरील भाविक राहणार नाहीत यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी. नगरपालिकेने व मंदीर समितीने सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक तेथे बॅकेकेटींग करावे. शासकीय निवासस्थान येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने बॅरेकेटींग करावे. मंदीर समितीने सर्व विधी पार पाडताना कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन पार पाडावेत. तसेच आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सातपुते म्हणाल्या, कार्तिक वारीत बाहेरील भाविक व नागरिक पंढरपूरात येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून त्रिस्तरीय नाकाबंदी ठेवण्यात आलेली आहे. संचारबंदीच्या कालावधीत शहरातील नागरिकांनी विनाकारण फिरु नये. राज्य परिवहन महामंडाच्या बसेस शहरापासून अर्धा किलोमिटर अंतरावर थांबवून प्रवाश्यांची तपासणी केली जाणार आहे. बाहेरील नागरिकांना अथवा भाविकांना तेथूनच परत पाठवण्यात येणार आहे.यासाठी वारी कालावधी बाहेरील नागरिकांनी व भाविकांनी शहरात येऊ नये. नदी स्नानासाठी बंदी असल्याने चंद्रभागा घाटावर तसेच नदीपात्रात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव लक्षात घेता नागरिक व भाविकांनी पंढरपूकडे येऊ नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली तर मंदीरसमितीचे कार्यकारी अधिकारी विठल जोशी यांनी मंदीर समिती मार्फत करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची माहिती दिली.

Related posts