27.5 C
Solapur
September 27, 2023
महाराष्ट्र

‘रेमडेसिवीर’साठी आता निर्यात बंदी असलेल्या कंपन्यांकडून माल घेण्याचे प्रयत्न सुरू – टोपे

राज्यात एकीकडे करोना संसर्ग वाढत असताना, दुसरीकडे रूग्णांना आवश्यक असलेला रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील ही बाब मान्य केलेली आहे. अनेक ठिकाणी रूग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळवण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर हा पुरवठा वाढवण्यासाठी व राज्य सरकारकडून कोणते प्रयत्न सुरू आहेत, याबाबत आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
राजेश टोपे म्हणाले, “ज्या कंपन्यांच्या निर्यातीवर केंद्र शासनाने बंदी आणलेली आहे, त्या कंपन्यांनी जर आपल्या राज्य शासनाला निर्यातीसाठी तयार केलेला रेमडेसिवीरचा जो साठा आहे, तो जर दिला तर या पाच-सात दिवसांत देखील निश्चित प्रकारे आपली जी काही कमतरता आहे ती दूर होईल.”
“आता राज्यशासन व केंद्र शासनाच्या अनुषंगाने आम्ही हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर जाऊन घेऊ किंवा मुख्यमंत्री देखील या संदर्भात केंद्र शासनाशी बोलणं करून, रेमडेसिवीरचे जे निर्यातदार आहेत, ज्यांच्यावर बंदी आहे. हे निर्यातदार जर त्यांचा माल आपल्याला देऊ शकले किंवा सात कंपन्यांच्या मार्फत देखील देऊ शकले. तरी देखील आपल्या राज्याच्या अतितातडीच्यादृष्टीने वापरासाठी उपयुक्त ठरू शकते.”
“१५ कंपन्यांना निर्यात बंदी केली आहे, त्यांच्याकडे माल तयार आहे. केवळ त्यांच्या निर्यात बंदी केलेला माल आपल्याला मिळू शकेल का? यासाठीचा प्रयत्न केला जात आहे. तो जर कायदेशीरदृष्टीने यशस्वी झाले तर काही अडचण राहणार नाही.”

Related posts