महाराष्ट्र

अभिजीत पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्य पदी नियुक्ती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर दोन्ही गटाकडून आपल्याकडे जास्त आमदार असल्याचा दावा करण्यात आला. वास्तविक अजित पवारांबरोबर जास्त लोकप्रतिनिधी असल्याचं समोर आलं. मात्र, अशा परिस्थितीत ज्या निष्ठावंतांनी शरद पवार यांची साथ दिली. त्यांना आता निष्ठेचं फळ मिळालं आहे. पंढरपूरचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. मात्र, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि खासदारांना शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेवर काम करण्याची संधी दिली होती. पक्ष फुटी नंतर शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या लोकांना या संस्थेवर काम करण्याची संधी शरद पवारांकडून देण्यात येत आहे. अभिजीत पाटील हे पंढरपूरचे असून विठ्ठल सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. अभिजीत पाटील आमदार रोहित पवारांचे निकटवर्ती मानले जातात. अभिजीत पाटील शरद पवार गटाचे पंढरपूरचे विधानसभा उमेदवार असू शकतात. वाळू व्यावसायिक ते साखर कारखानदार असा अभिजीत पाटील यांचा प्रवास आहे.

Related posts