मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गटाला आता नवं नाव आणि नवं चिन्ह मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आलं आहे. तर मशाल हे चिन्ह त्यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं आव्हान असणार आहे.
शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आलं आहे. तर त्यांनी दिलेल्या चिन्हांच्या तीन पर्यायांपैकी एकही चिन्ह त्यांना देण्यात आलं नाही. त्यामुळे त्यांना आता तीन नवे पर्याय देण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.
उद्धव ठाकरे गटाला मशालच का?
उद्धव ठाकरे गटाकडून चिन्हासाठी तीन पर्याय देण्यात आले होते. त्यामध्ये त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा समावेश होता. त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याने हे कुणालाही देता येणार नाही. तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूतील एका पक्षाचं चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. या आधी मशाल हे चिन्ह एका राजकीय पक्षाला देण्यात आलं होतं. पण त्या पक्षाला अपेक्षित मतं राखता आली नाहीत. त्यामुळे या चिन्हावरचं आरक्षण काढून घेण्यात आलं होतं. त्यामुळे आता हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला देण्यात आलं आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांना येत्या काळात मशाल या चिन्हासह निवडणूक लढावी लागणार आहे. तसेच मशाल हे चिन्ह कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.
शिंदे गटाला कोणतंही चिन्ह नाही
एकनाथ शिंदे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पण त्रिशूळ आणि उगवता सूर्य या चिन्हांबाबत आधीच भूमिका स्पष्ट झाली होती. तर तिसरा पर्याय म्हणजे गदा हे चिन्ह धार्मिक प्रतिक असल्यानं ते कुणालाही देता येणार नसल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. त्यामुळे शिंदे गटाने आता तीन नवे पर्याय द्यावेत असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांनी आपल्या चिन्हांचा आणि नावाचा पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी पक्षांच्या तीन नावाची आणि तीन चिन्हांच्या पर्यायाची नावं दिली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला.
previous post