आमदार कै. भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाची समाजमनावर वेगळी छाप – प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे
पंढरपूर-
‘पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाने समाज मनावर वेगळी छाप पाडली होती. त्यांच्या कार्यातून एक वेगळेपण दिसून येत होते. आपल्या मतदार संघातील जनतेच्या हृदयात त्यांनी अल्पावधीत स्थान मिळवले होते. कै. नानांच्या वयाचा विचार केला तर त्यांचे हे वय जाण्याचे नव्हते पण दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. हा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेवर मोठा आघात आहे. स्वेरी परिवार आणि गोपाळपुरकरांच्या वतीने त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.’ अशा शब्दात स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी भावनेला वाट मोकळी करून दिली.
प्रारंभी स्वेरी व गोपाळपूरच्या नागरिकांच्या वतीने गोपाळपूरचे माजी सरपंच शिवाजीराजे आसबे यांच्या हस्ते दिवंगत आमदार कै.भारत नाना भालके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे हे आमदार कै. भालके यांच्या कार्य-कर्तुत्वावर प्रकाश टाकत होते. यावेळी गोपाळपूरचे माजी सरपंच शिवाजीराजे आसबे म्हणाले की, ‘स्वेरी कॉलेजच्या समोरून नाना नेहमी जात-येत होते परंतु आज त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा दिवस उगवेल असे कधीच वाटत नव्हते. नाना माझे चांगले मित्र होते, सहकारी होते. त्यांच्या अकाली निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून येणे अशक्य आहे.’ स्वेरीचे संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे म्हणाले की ‘कै. भारतनानांमध्ये विशेष गुण आणि कर्तृत्व होते. ‘राजकारणाला खूप सोपे करुन सांगणारा माणूस’ म्हणून त्यांची जनमाणसात ओळख निर्माण झाली होती. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात सलग तीन वेळा आमदार होणे हे म्हणावे तेवढे सोपे नाही. हा एक विचारमंथनाचा भाग आहे.’ यावेळी माजी उपसरपंच धनाजी आसबे, उदय पवार, संभाजीराजे शिंदे (आंबे), दिलीप भोसले, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, संस्थेंअंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
छायाचित्र- पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे विद्यमान आमदार भारतनाना भालके यांना स्वेरीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गोपाळपूरचे माजी सरपंच शिवाजीराजे आसबे, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, माजी उपसरपंच धनाजी आसबे, उदय पवार, संभाजीराजे शिंदे , स्वेरीचे संस्थेचे संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, स्वेरीच्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी.