मतदान केंद्रावर निवडणुक साहित्यांसह कर्मचारी रवाना
सचिन झाडे .
पंढरपूर, दि :
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्यातील 8 हजार 151 मतदारांच्या मतदानाकरिता 20 मतदान केंद्रावर 299 मतदान अधिकारी व कर्मचारी रवाना झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी ढोले यांनी दिली आहे.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मंगळवारी 1 डिसेंबर रोजी सकाळी 8.00 ते 5.00 यावेळेत मतदान होणार आहे. पंढरपूर येथून पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस येथील चार तालुक्यातील नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले असून, या चार तालुक्यातील एकणू 72 मतदान केंद्राचे साहित्य वाटप करण्यात आले. चार तालुक्यातील शिक्षक मतदारसंघासाठी 28 तर पदवीधर मतदासंघासाठी 44 मतदान केंद्रावर साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर तर शिक्षक मतदासंघासाठी पंचायत समिती, शेतकी भवन, पंढरपूर येथून साहित्य वाटप करण्यात आले. यासाठी संबंधित तालुक्याचे अधिकारी कर्मचारी यांचीही नेमणूक करण्यात आली होती. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी 16 जीप 16 बसेस अशा 32 वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती, असेही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.
या निवडणुकीसाठी तालुक्यात 8 हजार 151 मतदार असून, तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील मतदान केंद्रावर 299 निवडणुक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षितेसाठी पोलीस कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेसा वीज पुरवठा, शौचालय, अपंगासाठी रॅमची सुविधा करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुक होत असल्याने मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी ढोले यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारासांठी असणाऱ्या रांगेत ठराविक अंतरावर मतदारांना उभे राहता यावे यासाठी तीन स्वतंत्र्य रांगा करण्यात आल्या आहेत. तसेच मतदारामध्ये समाजिक अंतर रहावे यासाठी चिन्हांकित वर्तुळे करण्यात आली आहेत. मतदारांना आखुन दिलेल्या रांगेतच उभे राहता येणार आहे. मतदारांनी मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत पसंती क्रम अंकात लिहावा. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड-19 च्या आजारबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करुन आपली जबाबदारी पार पाडावी. तसेच मतदारांनी आपल्या अमुल्य मताचा हक्क बजावावा असे आवाहनही श्री.ढोले यांनी यांनी केले आहे.