पंढरपूर

पटवर्धन कुरोली येथील पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांची मदत

‘डॉ.रोंगे सरांच्या सामाजिक कार्याचे अनुकरण आवश्यक’-पांडुरंग आण्णा नाईकनवरे

पंढरपूर-
‘तालुक्यात पूर्वी डॉ. रोंगे सरांना केवळ शिक्षणापुरते ओळखले जात होते पण आता गेल्या काही वर्षापासून डॉ. रोंगे सरांना त्यांचे सामाजिक कार्य, दूरदर्शीपणा आणि समाजासाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन या बाबींबाबत ओळखले जात आहे. डॉ.रोंगे सरांच्या अभ्यासाचे महत्व आज नागरिकांना पटत असून आज त्यांच्या शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्याचे देखील अनुकरण करणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन पांडुरंग आण्णा नाईकनवरे यांनी केले.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने राज्यात थैमान घातल्याने सर्वत्र पाण्यामुळे हाहाकार उडाला होता. त्यामुळे शेतीचे व पिकांचे दृष्य विदारक दिसत आहे. अशात स्वेरीचे डॉ. रोंगे सर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथे भेट देऊन सुमारे शंभर पूरग्रस्त कुटुंबियांना आवश्यक अन्नधान्याचे वाटप केले. प्रास्ताविकात प्रा. सुनील भिंगारे यांनी डॉ.रोंगे सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची ओळख करून दिली व पटवर्धन कुरोलीमध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. यावेळी डॉ. रोंगे म्हणाले की, ‘ मागील काही दिवसापासून पटवर्धन कुरोली मधील नागरिक पुराच्या परिस्थितीला टक्कर देत धैर्याने लढत आहेत. खरंच त्यांचा संयम कौतुकास्पद आहे. या गावातील जागरूक नागरिकांशी चर्चा केल्यानंतर मदत करण्याचे ठरवले. आपणा सर्वांना सध्याच्या परिस्थितीला तोंड देत संकटावर मात करायची आहे. त्यामुळे धीर सोडू नका. येथील अवस्था पाहून छोटीशी मदत करावीशी वाटली तरी त्याचा आपण स्विकार करावा. तसेच सध्याची परिस्थती पाहता गरजू पूरग्रस्तांच्या पाल्यांना ‘कमवा व शिका’ योजनेतून स्वेरीमधील अभियांत्रिकी, फार्मसी व एम.बी.ए. या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.’ असे डॉ. रोंगे यांनी सांगितले. यावेळी पटवर्धन कुरोली मधील सुमारे शंभर पूरग्रस्त कुटुंबीयांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी दशरथ जवळेकर, रेणुका दूध डेअरीचे चेअरमन गणेश मोरे, वकील वैभव नाईकनवरे, प्रगतशील बागायतदार वैजनाथ नाईकनवरे, छावा संघटनेचे नौशाद शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कांतीलाल नाईकनवरे यांच्यासह पटवर्धन कुरोली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts