कोरोनाचा जोर ओसरत असताना राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली आहे. जवळपास दोन वर्षानंतर आता राज्यातील शाळांमध्ये लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येणार आहे. पाल्यांना मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती नसणार आहे. लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात येणार आहेत.
शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सने हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय निर्णय होईल याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य मंत्रिमंडळाने पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. राज्यातील काही ठिकाणी याआधीपासूनच चौथीपासून, सातवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टींमध्ये शिथिलता येत आहे. आता पहिली ते चौथी शाळा सुरु होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले होते. पहिली ते चौथी सर्व विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत. त्यांचे लसीकरण केले पाहिजे. 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करावे हा मुद्दा मांडला गेला आहे. पहिली ते चौथी शाळा सुरु करायला परवानगी द्यावी असंही त्यांनी म्हटलं होते. मात्र, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकार टास्क फोर्सच्या अहवालानंतर निर्णय घेणार आहे.
शहरी भागात पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यास चाईल्ड टास्क फोर्सने हिरवा कंदील दिला होता. राज्य शासनाने इतर बाबींची पूर्तता केल्यास, शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याचा चाइल्ड टास्क फोर्सचे म्हणणे आहे. चाईल्ड टास्क फोर्सने हिरवा कंदील दाखवला असला तरी शाळा सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतरच होणार होता. अखेर आजच्या मंत्रिमंडळात याला मंजुरी देण्यात आली.