भारत

भारतातील रुग्णवाढ अमेरिकेपेक्षा भयंकर

भारतात कोरोना विषाणूचा फैलाव गतीने होत असून या महामारीने मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित होऊ लागले आहेत. सद्य:स्थितीत रुग्णवाढीचा भारतातील वेग हा अमेरिकेपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.
भारतात गेल्या 10 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेत रुग्णसंख्या एक लाखावरून दोन लाखांवर पोहोचण्यासाठी 21 दिवस लागले होते. आपल्याकडे मात्र हे प्रमाण अवघ्या दहा दिवसांवर असल्याने चिंता व्यक्‍त होत आहे. पुढील पाच दिवसांत रुग्णवाढ 3 लाखांनी वाढू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
भारतात 5 एप्रिल रोजी, एका दिवसात 96 हजार 57 रुग्ण आढळले होते. तर दहा एप्रिल रोजी 1 लाख 52 हजार 682 रुग्ण आढळले. त्यानंतर लगेच म्हणजे, रविवारी, 11 एप्रिल रोजी 2 लाख 739 रुग्ण आढळले. मृतांच्या संख्येतही अशीच दुप्पट वाढ झाल्याचे दिसते. 5 एप्रिल रोजी कोरोनामुळे देशभरात 445 जणांचा मृत्यू झाला. तर दहा एप्रिल रोजी 838 जणांचा बळी कोरोनाने घेतला. 11 एप्रिल रोजी हीच संख्या दुप्पट म्हणजे 1038 वर पोहोचली.
अमेरिकेत 30 ऑक्टोबर 2020 रोजी एका दिवसात एक लाख रुग्ण आढळले होते. तर 20 नोव्हेंबर 2020 रोजी ही रुग्णसंख्या दुप्पट म्हणजे 2 लाख झाली. भारतात अवघ्या दहा दिवसांत रुग्ण वाढल्याने स्थिती चिंताजनक आहे. रुग्ण वाढलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ आणि कर्नाटकचा समावेश आहे.

Related posts