महाराष्ट्र

भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं

शेतकऱ्यांची वीज तोडणी केल्याप्रकरणी जळगावात भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं. चाळीसगावचे आमदार भाजपा आमदार मंगेश चव्हाण आपल्या समर्थकांसह अभियंत्याच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी वीज तोडणीचा जाब विचारला. दरम्यान यावेळी धक्काबुक्की करण्यासह अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
\मंगेश चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह महावितरण अधिक्षक अभियंत्यास धक्काबुक्की करण्यासह अंगावर धावून जाण्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे त्याविरोधात आम्ही येथे आलो आहोत. पाणी दोन दिवसांत जोडलं गेलं नाही तर हातातोंडाशी आलेलं पीक जाऊ शकतं. त्यासाठी शेतकऱ्यांसोबत आलो असता शेख यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना जागेवरच बांधून ठेवलं,” असं मंगेश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
महावितरण अधिक्षक अभियंता मोहम्मद फारुख मोहम्मद युसुफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगेश चव्हाण आणि त्यांचे जवळपास ५० समर्थक त्यांना भेटण्यासाठी एमआयडीसी परिसरातील कार्यालयात आले होते. त्यावेळी एकेरी भाषेत बोलून धक्काबुक्कीसह अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

Related posts