साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने N.D.R.F. मधून तात्काळ मदत करावी अशी मागणी धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभेचे खासदार मा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शून्य प्रहाराच्या माध्यमातून चर्चेत भाग घेऊन यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यासह, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने खुप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्हयात 4 लाख 16 हजार शेतकऱ्यांचे 2 लाख 62 हजार हेक्टर इतके क्षेत्र, सोलापूर जिल्हयातील बार्शी तालुक्यात 75 हजार 781 शेतकऱ्यांचे 68 हजार 768 हेक्टर क्षेत्र व लातूर जिल्हयातील औसा , निलंगा तालुक्यातील 1 लाख 52 हजार 417 शेतकऱ्यांचे 95 हजार 777 हेक्टर शेती क्षेत्राचे ऐवढया मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा एकुण 6 लाख 43 हजार 998 शेतकऱ्यांना 4 लाख 26,645 हेक्टरवरील क्षेत्रासाठी 458 कोटी 68 लाख ऐवढी भरीव मदत राज्य शासनाने दिली आहे. परंतु केंद्र सरकार कडून मदत मिळाली नाही.
तरी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने N.D.R.F. मधून तात्काळ मदत करावी. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे N.D.R.F. मधून राज्य शासनाच्या 3 हजार 421 कोटी रु.चा प्रस्ताव मंजुर करून निधी राज्य शासनाला देण्यात यावा. अशी मागणी खा. ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी केली.