पंढरपूर-
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (पदवी व पदविका) व कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी व पदविका) या चारही महाविद्यालयांचा पुणे येथील इव्हॉल्वींग एक्स सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड सोबत नुकताच सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
हा करार स्वेरीच्या संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी यांना एका नवीन क्षेत्रासंबंधातील कौशल्य वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. स्वेरीतील प्राध्यापकांचा शिक्षणातील प्रदीर्घ अनुभव विचारात घेवून ‘इव्हॉल्वींग एक्स सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर कंपनीतर्फे कार्यकारी अधिकारी अमोल निटवे व महाविद्यालयातर्फे अनुक्रमे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी) चे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार व कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) चे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या करारानुसार संस्थेतील चारही महाविद्यालयात या संदर्भात संशोधन होणार आहे. या कराराद्वारे विद्यार्थ्यांची बौद्धिक, मानसिक कार्यक्षमता सुधारणे व क्षमता वाढविणे, लाईफ स्कील, सॉफ्ट स्कील, कौशल्य विकास यामध्ये असलेल्या कमतरता दूर करणे यासाठी मदत होणार आहे. या करारामुळे एज्युकेशन आणि कार्पोरेट यांच्यातील दरी कमी होणार आहे. पूर्वी स्वेरीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर ३० कंपन्यांबरोबर सामंजस्य करार स्थापित झालेले आहेत. अशा या करारामुळे स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबरच संशोधनाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या हेतूने १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरवात झाली. तेथून पुढे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे एवढ्यावरच न थांबता त्यांचा कल संशोधनाकडे कसा वळवता येईल हे पाहून त्या दृष्टीने संस्थेने पाऊले उचलली आहेत. याच कारणामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी व परराज्यातील विद्यार्थी देखील स्वेरीकडे शिक्षणासाठी वळत आहेत. भारत सरकारच्या भाभा अणुसंशोधन केंद्रासह इतर अनेक संस्थाबरोबर झालेल्या करारांमुळे आजमितीस संशोधनासाठी रु. ७ कोटी पेक्षा जास्त निधी प्राप्त झाला आहे. स्वेरीचे विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट आणि विद्यापीठात सर्वोच्च निकाल मिळविण्याबरोबरच संशोधनाकडे वळत आहेत ही सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रालादेखील गौरवाची बाब आहे.
हा करार पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संशोधन अधिष्ठाता डॉ. संतोष साळुंखे व ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे यांनी परिश्रम घेतले. या करारामुळे संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इनचार्ज प्रा. एम. एम. पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.