24.4 C
Solapur
September 23, 2023
महाराष्ट्र

बापाचा नाद करायचा नाही म्हणत सुप्रिया सुळेंच पवारांच्या समोर जोरदार भाषण

मुंबई: लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी… बाकी कुणावरही बोला पण बाप आणि आईचा नाद नाही करायचा असं खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठणकावलं. पक्षातल्या वडीलधाऱ्यांना सांगताय की तुमचं वय झालं, आता थांबा, अरे यांच्यापेक्षा आम्ही मुली बऱ्या, जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा तीच अहिल्या होते आणि ताराराणी होते असंही त्या म्हणाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 2019 मध्ये 11 जागा राष्ट्रवादीच्या होत्या पण हा योद्धा लढला. राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर हे शरद पवार आहे. ही लढाई भाजपच्या विरोधात आहे. भाजप या देशातला सर्वांत भ्रष्टाचारी पक्ष आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काही जणांमुळे माझं मन घट्ट झालंय. रतन टाटा अजूनही लढत आहे. आपल्यात फक्त जिद्द पाहिजे, वय फक्त क्रमांक आहे. 2019 मी विसरले नाही, ते विसरले असतील. मोदी यांनी राष्ट्रावादीने 70 हजार कोटींचा घोटाळा केला असे म्हटलंय. नरेंद्र मोदी हे आधी राष्ट्रवादीला नॅचरली करपट पार्टी म्हणायचे. आता त्यांनाच राष्ट्रवादीची गरज पडते. त्यामुळे या देशात सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष हा भाजप आहे.

पक्षचिन्ह जाऊ देणार नाही
पक्षाच्या ज्या नेत्यांनी निवडून दिलं त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली असं सांगत शरद पवार म्हणाले की, काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी काही केलं तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्ष जाऊ देणार नाही. जे माझा फोटो लावतात, त्यांना माहिती आहे की त्यांचं नाणं चालणार नाही असा टोला शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर केला. मला पांडूरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं सांगायचं असा कार्यक्रम काहींनी सुरू केला आहे.

भुजबळ म्हणाले काय सुरू आहे ते बघून येतो आणि….
शरद पवार म्हणाले की, हे सर्व घडत असताना छगन भुजबळ यांनी राजभवनवर काय सुरू आहे ते बघून येतो असं सांगितलं आणि तिकडे जाऊन शपथ घेतली. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी अनेक वेळा वेगळा विदर्भ केला पाहिजे असं भाष्य केलं आहे. पण आज काय झालं विदर्भाबाबत? त्यावर हे काहीही करत नाहीत. राज्याच्या इतिहासात असला मुख्यमंत्री पाहिला नाही असं त्यांनी अनेकदा त्यांच्या जुन्या भाषणात म्हटलं होतं. मग आता असल्या मुख्यमंत्र्यासोबत तुम्ही कसं काय बसता?

Related posts