महाराष्ट्र

पंकजा मुंडे राजकारणात नवा बॉम्ब फुटणार

पण पंकजाताई काँग्रेसमध्ये येणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीमुळे अवघ्या राज्यातील राजकारण तापले आहे. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पंकजा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. त्यांनी यासाठी दोनवेळा दिल्ली दौरे केल्याचेही वृत्त आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक बॉम्बगोळा फुटण्याची शक्यता आहे.

नाना पटोलेंचे कानावर हात

दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी आपल्या कानावर हात ठेवलेत. पंकजा मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशासंबंधीची मला कोणतीही माहिती नाही. पण पंकजाताई काँग्रेसमध्ये येणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे, असे ते म्हणाले.

सोनिया-राहुल गांधींची घेतली भेट

पंकजा मुंडे भाजपच्या बड्या नेत्या आहेत. त्या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. पण सध्या त्या नाराज आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा आपली वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी याला दुजोरा दिला आहे.

पंकजांनी दोनवेळा दिल्लीत जाऊन काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पक्ष प्रवेशाच्या मुद्यावर विस्तृत चर्चा केली. सांगलीच्या एका बड्या नेत्याकडून पंकजा मुंडेंसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बाळासाहेब थोरातांनी दिली होती ऑफर

विशेष म्हणजे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पंकजा मुंडे या आमच्या भगिणी आहेत. त्यांच्यावर अन्याय होत आहे. यामुळे त्यांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण झाली असून, त्यातूनच त्यांनी भाजप आपला पक्ष नसल्याचे विधान केले आहे. भाजपच्या उभारणीत त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. त्यांच्यासाठी काँग्रसचे दरवाजे कायम खुली आहेत, असे थोरात म्हणाले होते. येथे वाचा संपूर्ण बातमी…

BRS, MIM कडूनही मुख्यमंत्रीपदाची ऑफर

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही पंकजा मुंडे यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. यासाठी त्यांनी थेट त्यांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली आहे. पण पंकजांनी यावर अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. बीआरएसच्या प्रस्तावापूर्वी एमआयएमनेही त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. येथे वाचा संपूर्ण बातमी…

नकारात्मक बोलण्याचा प्रश्नच नाही

पंकजा मुंडे यांनी नुकताच एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्या म्हणाल्या की, सर्वच पक्ष माझ्याविषयी सकारात्मक बोलत आहेत. माझ्याविषयी कुणी सकारात्मक बोलत असेल, तर मी कुणाविषयी मी नकारात्मक बोलण्याचा प्रश्नच येत नाही. मला आलेल्या ऑफरवर मी सध्या गांभीर्याने पाहिले नाही. पण बघणार नाही असे अजिबात नाही. कारण, कोणत्याही व्यक्तीला सिरीयसली न घेणे हा त्यांचा अपमान असतो, असे पंकजा म्हणाल्या.

Related posts