शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी ५७ कोटी रुपये गोळा केले असून ही रक्कम अजून जास्त असण्याची शक्यता असल्याचं संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. जर किरीट सोमय्यांना केंद्रीय सुरक्षाव्यवस्था दिली असेल तर केंद्र सरकराने या देशाच्या सुरक्षेसाठी खेळणाऱ्या देशद्रोही व्यक्तीला सुरक्षा देत देशाशी धोका केला आहे असा संताप यावेळी त्यांनी व्यक्त केला.
“किरीट सोमय्या विक्रांत वाचवा असे टी शर्ट घालून फिरत असताना लाखो, करोडो लोकांनी त्यांना पैसे दिले. याशिवाय अनेक कंपन्यांकडून त्यांनी विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधी गोळा केले. ही रक्कम ५७ ते ५८ कोटी होती अशी माहिती त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.