प्रतिक शेषेराव भोसले
पुणे – (प्रतिनिधी)
स्त्री ही आई, बहीण, पत्नीची भूमिका पार पाडत कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पेलत असते. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रिया पुरुषांवर अवलंबून असल्याने त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याचा फारसा अधिकार नाही. त्यामुळे आजही त्यांचे स्थान नगण्यच असल्याने त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होताना दिसतो. आधुनिक काळात त्यांना राजकीय, प्रशासकीय व व्यवस्थापन क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळाली पाहिजे, तरच त्यांचा आर्थिक दर्जा सुधारेल व राष्ट्राच्या प्रगतीत त्यांचे योगदान वाढेल. प्रत्येक स्तरातील महिलांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत, यात छेडछाड, विनयभंग, बलात्कार असे मुद्दे येतात त्याचबरोबर आता एकतर्फी प्रेमातून केले जाणारे ॲसिड हल्ले, चाकू हल्ले तसेच कॉलेजला जाणाऱ्या, ऑफीस मध्ये काम करणाऱ्या मुलिंना / महिलांना बऱ्याच वेळा छेडाछेडीला तोंड द्यावे लागते.
या सगळ्यामागे तिच्यावर त्याने प्रस्थापित केलेला मालकीहक्कच कारणीभूत आहे. समोरची व्यक्ती म्हणजे स्त्री ही आपल्या मालकीची वस्तू असल्याने तिच्यावर अन्याय, अत्याचार करणे सहज शक्य आहे, असे पुरुषाला वाटत राहते, ती प्रतिकार करू शकणार नाही असे गृहीत धरूनच पुरुषांकडून एवढी हिंमत होते. स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यावर त्याचे पडसाद हे वेगवेगळ्या स्तरांवर उमटतात. अगदी रस्त्यांपासून संसदेपर्यंत पण त्या घटना होऊ नयेत म्हणून जनजागृती मात्र कमीच होते.
म्हणून ह्या गोष्टी लक्षात घेऊन निःस्वार्थ युथ फाऊंडेशन जनजागृती करण्याचे काम करत आहे. या नव युगात फक्त बोलायला स्त्री – पुरूष समानता आहे स्त्रियांवरील अन्याय थांबवण्यासाठी व वाईट आणि चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात ‘ निःस्वार्थ कन्या सुरक्षा पथक देखिल स्थापन केले आहे. परंतु कोणाचा पाठींबा नसल्याने पथकास कार्य करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे होणारे अत्याचार आणि अन्याय लक्षात घेऊन ४ मागण्यांचे निवेदन तेथील पथकाच्या माध्यमातून तहसीलदारांना
देण्यात आले.
आणि एवढे सर्व करून सुद्धा आमच्या मागण्या मान्य न झाल्यास व हे अन्याय असेच चालू राहिल्यास निःस्वार्थ युथ फाउंडेशन रस्त्यावर उतरण्यासाठी सुद्धा मागे – पुढे बघणार नाही