महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य महिला आयोगाचे पद हे संवैधानिक आहे, या पदावर काम करताना ते निपक्षपातीपणे व्हावे हे अपेक्षित असते म्हणून मी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात आज त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला संघटनांच्या पदाधिकारी मुंबईतील पक्ष कार्यालयात यावेळी उपस्थित होत्या. चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर जयंत पाटील यांनी महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले, ते म्हणाले, जिल्ह्यांना निरीक्षक द्यायचे व जिल्ह्यांच्या कामांवर लक्ष द्यायचे ही संकल्पना रुपाली चाकणकर यांची होती. तालुका निरीक्षकांचीही नेमणुक रुपाली चाकणकर यांनी केली.
गत दोन अडीच वर्षे संपुर्ण महाराष्ट्रात पक्ष कार्यरत व्हावा, तालुक्यात आंदोलन झाले की नाही हे पाहणे, संबंधितांना जागे करून कामाला लावायचे काम रुपाली चाकणकर यांनी केले. मी मतदारसंघात जे काम करतो, त्यापेक्षा जास्त रुपाली चाकणकरांनी चांगले काम केले. महिला संघटनेत गुणात्मक फरक चाकणकरांमुळे दिसला. कोणत्या तालुक्यात किती आंदोलने झाली व ती कशी झाली याचे मुल्यमापन त्यांनी केले व आम्हाला याची पीडीएफ फाईल दिली. त्यांचे काम गुणात्मक असल्याचेही त्यांनी नमुद केले.
विधानसभेच्या मतदारसंघाच्या बाहेरील उरलेले मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी फार काम करावे लागणार असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. चित्रा वाघ यांनी पक्ष सोडला त्यावेळी नाव सापडत नव्हते, तेव्हा चांगले काम करणाऱ्या रुपाली चाकणकर यांना नेमण्यात आले याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
डोळ्यात पाणी ही चाकणकरांच्या कामाची पावती
रुपाली चाकरणकर यांच्या कल्पना पक्षासाठी लाभदायक ठरल्या. दोन वर्षे त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले. त्यांच्या राजीनाम्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आले हे त्यांच्या कामाची पावती आहे असे जयंत पाटील म्हणाले.
रुपाली ताई राजीनामा मागे घ्या
रुपाली चाकणकर यांनी अनपेक्षितपणे राजीनामा दिला. याचा धक्का उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना बसला. त्यांच्या डोळ्यात पाणीही आले. रुपाली ताई राजीनामा परत घ्या अशी विनंतीही त्यांना गराडा घालीत महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी केल्याचे दिसून आले.
तुमच्याशिवाय संघटनेचा विचार करु शकत नाही
रुपाली चाकणकर यांनी राजीनाम्यांची घोषणा केली याचे त्यांच्या फेसबुक पेजवर प्रसारण करण्यात आले. त्यांच्या राजीनाम्यानंतर फेसबुक पेजवर असंख्य प्रतिक्रीया पोस्ट झाल्या. त्यात ”सर्व काही संपले असं वाटत असताना महिला संघटनेला आज आपल्यामुळे मिळालेली ही उभारी आहे रुपाली ताई… तुमच्या शिवाय महिला संघटनेचा विचारही नाही करू शकत आम्ही.” असा आशय एका प्रतिक्रीयेत आहे.