मुंबई: बार्शीचे आमदार आमच्यासोबत आले म्हणून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला जातोय, सोलापुरातही एक ‘सचिन वाझे’ आहे जो महिन्याला लाखोंची वसुली करतोय असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या सभागृहात सदस्यांनी बोलल्यानंतर त्यांच्यावर प्रशासन डूख धरणार असेल तर सदस्यांनी बोलायचं की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे सोलापुरातील अवैध धंद्यांवर बोलले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना किंवा त्यांच्या मुलाला फसवण्याची धमकी दिली जाते. या सभागृहात बोलल्यानंतर लोकप्रतिनिधींवर पोलीस दंडुकशाही करणार असतील तर ते चुकीचं आहे. राजेंद्र राऊत यांच्या मुलांच्या जीवाला धोका आहे, तसे पत्र आपण महासंचालकांना दिले आहे.
सोलापुरातही ‘सचिन वाझे’
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बार्शीतील आमदार राजेंद्र राऊत यांना धमकी देणाऱ्या पोलीस निरीक्षकाचे रेकॉर्ड काय आहे? त्यांचे अनेकदा निलंबन करण्यात आलं आहे. त्यांच्या वरदहस्ताखाली अनेक अवैध धंदे सुरू आहेत. राजेंद्र राऊत अपक्ष निवडून आल्यानंतर ते आमच्यासोबत आले म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जाते. सोलापुरात एक ‘सचिन वाझे’ आहे. त्याच्याकडून महिन्याकाठी 60 लाखांची वसुली केली जाते. हे पैसे वरतीपर्यंत द्यावे लागतात असं तो म्हणतो. दिलीप वळसे पाटील यांचं मी नाव घेत नाही. कारण अनेक वर्षे मी त्यांना ओळखत आहे.”
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी छोटं का होईना पण भाषण केलं याचा आनंद आहे असा टोला फडणवीसांनी लगावला. यानंतर फडणवीसांनी मुंबईत झालेल्या घोटाळ्यांची यादी वाचून दाखवली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करतंय असं मुख्यमंत्री म्हणतात. मात्र या सरकारने बांधावर जाऊन हेक्टरी 50 हजार रुपये मिळायला हवे असं आश्वासन दिलं होतं, त्याबद्दल आता बोलायला नको. ना नवे प्रकल्प, ना नवे योजना, सुरु प्रकल्प बंद, केवळ टीका, आरोप, टोमणे या पलिकडे काहीच नाही.”