24.2 C
Solapur
September 26, 2023
महाराष्ट्र

‘ब्रेक द चेन’च्या सध्याच्या निर्बंधांवर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज?

मुंबई : राज्यातील ब्रेक द चेनच्या सध्याच्या निर्बंधांवर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवारांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत लॉकडाऊनवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील नागरिक संचारबंदीचे नियम पाळत नाहीत. राज्यात कडक निर्बंध असतानाही नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या जे निर्बंध आहेत त्यांना अधिक कडक करण्याची गरज असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मत असल्याचं समजतंय.
राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत जे नियम लागू करण्यात आले आहेत त्यामध्ये अधिक काटेकोरपणा आणून ते कडक करावेत, तसेच ज्या घटकांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे त्याची यादी कमी करावी असं उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मत असल्याचं समजतंय. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार यावर आपलं मत मांडण्याची शक्यता आहे. त्या आधी मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचे आणि काही नियमांमध्ये बदल करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ होताना दिसत आहे. सोमवारी राज्यात 58 हजार 412 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 52 हजार 412 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 39 लाख 59 हजार 240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 76 हजार 520 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.04 टक्के झाले आहे.

Related posts