26.8 C
Solapur
February 29, 2024
दक्षिण सोलापूर

अट्टल गुन्हेगारास मंद्रुप पोलिसांकडून अटक – डीवायएसपी प्रभाकर शिंदे यांची माहिती

अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर

खून व दरोड्यातील व स्वस्तात सोने देतो म्हणून तेरामैल जवळ कर्नाटकातील तरुणावर हल्ला करून फरार झालेल्या अट्टल गुन्हेगारास मंद्रुप पोलिसांकडून अटक केल्याची माहिती, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

याबाबतची माहिती अशी की, ४ ऑक्टोबर रोजी तो दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान वरील आरोपी व त्याचे दोन साथीदार राहुल भोसले व पिंट्या पवार यांनी फिर्यादी सोहेल सलीम अहमद मुल्ला (वय २३) राहणार जमखंडी रोड, विजयपूर (कर्नाटक) व त्याच्या साथीदारांना स्वस्तात सोने देतो म्हणून फोनवरून येण्यास सांगितले. तेरामैल- औराद रस्त्यावर एक किलोमीटर आतमध्ये वरील आरोपींनी फिर्यादी मुल्ला व त्याचे मित्र नागराज पुजारी, अभिषेक क्षीरसागर व विश्वनाथ गडाळे सर्व राहणार विजयपूर यांना घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी विश्वनाथ गडाळेच्या डाव्या हातावर कमरेच्या तलवारीने वार केला. तर इतरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात आरोपीने त्यांच्याजवळील दहा हजार तीनशे रुपये व पल्सर मोटरसायकल (के.ए २८ इ.यु.१३०६) असा एकूण ७५ हजाराचा मुद्देमाल लुटला. याबाबत कर्नाटक पोलिसांमध्ये याची नोंद झाली होती. पण त्यांनी २४ ऑक्टोबर रोजी मंद्रुप पोलिसात फिर्याद दिली. त्यांनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. या प्रकरणात अशोक उर्फ आशिकाऱ्या छपरु काळे (वय ३५) राहणार नायकोडे वस्ती, मोहोळ, सध्या पानमंगरूळ (ता. अक्कलकोट) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

या कारवाईत मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे, पीएसआय गणेश पिंगूवाले, हवालदार विश्वास पवार पोलीस शिपाई भरत चौधरी, यशवंत कलमाडी, किरण चव्हाण, संजय कांबळे, अमोल वाघमारे, महांतेश मुळजे, ओंकार व्हनमाने तसेच सायबर शाखेतील रवी हातकीले यांनी महत्त्वाची कामगिरी केली.
………

स्वस्त सोन्याच्या खरेदी पासुन सावधान

अलीकडच्या काळात अनेकांना स्वस्त दरात सोने देतो म्हणून फोन करून अनेकांना लुटले गेले आहेत तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की तसे काही आढळून आल्यास लवकरच आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावे.

मा. प्रभाकर शिंदे
डी.वाय.एस.पी. सोलापूर

Related posts