राज्यात करोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे लसींचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. दरम्यान राज्य सरकारने करोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर निर्बंधांची घोषणा केली असून वीकेण्ड लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लावण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॉकडाउनसंबंधी मोठं विधान केलं आहे.
“जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर महाराष्ट्र लॉकडानच्या दिशेने वाटलाच करेल,” असं राजेश टोपे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे. “आम्ही लॉकडाउनच्या समर्थनात नाही, पण जर परिस्थिती सुधारली नाही तर साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन महत्वाचा आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
विजय वडेट्टीवारांकडून तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाउनची मागणी
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लागू करण्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. टीव्ही ९ शी बोलताना ते म्हणाले की, “विकेण्ड लॉकडाउनची आवश्यकता होती. रुग्णसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे हा आकडा पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात १० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीत भविष्यात पूर्णच लॉकडाऊन करावा लागेल. रेल्वेवर निर्बंध आणावे लागतील, गर्दी कुठेही होणार नाही हे पहावं लागेल”.
पुढे ते म्हणाले की, “परिस्थिती हाताळण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्सेस कमी पडतील. साडे पाच हजार डॉक्टर जे आता अंतिम परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना ठिकठिकाणी कामाला लावत होतो, तरीदेखील मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे वीकेण्ड नाही तर मी मुख्यमंत्र्यांना तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लावण्यास सांगणार आहे”.
पुढे ते म्हणाले की, “कडक लॉकडाउन केल्याशिवाय निरपराध लोकांचे प्राण वाचवू शकत नाही. करोनाचा प्रसार झालेला असून अशा परिस्थितीत पूर्णत: लॉकडाउनची आवश्यकता असून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे”.
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी मुंबई लोकल प्रवासावर निर्बंध आणण्याचेही संकेत दिले. “लोकल प्रवासासाठी काही वेळा ठरवून द्याव्या लागतील. आरोग्य यंत्रणा आणि अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा द्यायला पाहिजे. त्यामुळे आता गेल्यावेळप्रमाणे लोकल प्रवासाचे नवे धोरण आखण्याची गरज,” असल्याचं त्यांनी म्हटलं.