महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

कोल्हापूर जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय आज (दि. ०४) सकाळी 10 वाजता झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या त्याप्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची भासणारी कमतरता पाहता आज तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, की जिल्ह्यामध्ये सध्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रूग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी उद्या 11 वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करावा.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयानेही लॉकडाऊनचा पर्याय सुचवला आहे. रूग्णसंख्या थांबविण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. पोलिसांनी त्याची अंमलबजावणी करावी. आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी, लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना सूट देवून लॉकडाऊन कडकडीत करावा, असे सांगितले.
जिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्ह दर कमी नाही. जिल्ह्यातील 2400 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्हयातून पुरवला जात आहे. उद्या बुधवार दि. 5 मे सकाळी 11 पासून जिल्ह्यात पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Related posts