जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या. 53 ग्रामपंचायतसाठीची रणधुमाळी सुरू झाली. प्रत्येक पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी कंबर कसली. काही ठिकाणी महाविकास आघाडी करून एकत्र लढले तर बहुतांश ठिकाणी स्वातंत्र्य लढत झाली. त्यात प्रामुख्याने शिवसेना आणि भाजपने मोठ्याप्रमाणात विजय मिळवला. तर दोन्ही काँग्रेसला दोन अंकी संख्या देखील गाठता आलेली नाही.
सुरुवातीपासून कळंब तालुक्याला शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र शिवसेने स्वातंत्र्य लढून किती ग्रामपंचायत जिंकल्या हा देखील प्रश्न आहे. कळंब तालुक्यातील गाव- खेड्यातील शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे. प्रत्येक गावात तुम्हाला शिवसेनेची शाखा पाहायला मिळेल. म्हणून आत्तापर्यंत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रत्येक निवडणुकीत लढत व्हायची. त्यात अनेकदा शिवसेनेची सरशी पाहायला मिळायची.
यंदा शिवसेनेने 31 जागांवर दावा केलाय, जर वास्तवात तेवढ्या ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असतील तर शिवसेनेचा हा मोठा विजय मानला जाईल. त्यात तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांचा गावागावात असणारा जनसंपर्क यात कामाला आला असंच म्हणता येईल.
राणा पाटलांना मिळाला कळंब तालुक्यात अजित पिंगळेंच्या रुपात सेनापती
कधीकाळी तुळजापूरचे आमदार राणाजगजित सिंह पाटील हे राष्ट्रवादीत होते तर अजित पिंगळे हे शिवसेनेत. आता मात्र राणा दादांनी भाजपात प्रवेश केल्याने आणि जिल्ह्याचा नेतृत्व स्वीकारल्याने कळंब तालुक्यासाठी त्यांना अजित पिंगळे यांच्या रुपात खंदा सेनापती मिळाला आहे. आत्तापर्यंत तालुक्यात नावाला असलेल्या भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. जवळपास 20 ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता मिळवली आहे तर समिश्र जागा पाहिल्यास ही संख्या आणखी वाढते.
पूर्वी राष्ट्रवादीत असलेले गाव पुढारी जे आता राणा पाटील यांच्यासोबत भाजपात गेलेत त्यांनी पाटील आणि पिंगळे यांच्या नेतृत्वात आपल्या ग्रामपंचायती पुन्हा मिळवण्यात यश मिळवले आहे. त्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या येरमाळामध्ये विकास बारकुल,कण्हेरवाडीचे रामराजे जाधव, बोर्डा गावात प्रणव चव्हाण, मंगरूळमध्ये भागचंद बागरेचा, अथर्डीत अरुण चौधरी, उमरा परतापूरचे भागवत ओव्हाळ, सात्राचे तात्या थोरबोले या सर्व मंडळींना आपली ग्रामपंचायत राखण्यात यश आले आहे.
वरील सर्व गाव पुढारी हे पूर्वी राष्ट्रवादीत होते मात्र त्यांनी राणा दादांचे नेतृत्व स्वीकारून भाजपात प्रवेश केला होता. त्यात अजित पिंगळे यांचा तालुक्यात असलेला दांडगा जनसंपर्क आणि अनुभव कामाला आला. त्यामुळे राणा दादा आणि अजित दादा यांच्या नेतृत्वात भाजपने तालुक्यात मुसंडी तर मारली आहे. त्यासोबत भाजपला अजित पिंगळे नावाचा खंबीर नेतृत्व देखील मिळाला.
राष्ट्रवादी गेली कुठे?
कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेस हे तालुक्यातील प्रमुख पक्ष मानला जायचा. मात्र सध्या राष्ट्रवादीला गळती लागली आहे. अनेक गाव पुढारी यांनी राणा पाटील यांच्यासोबत भाजपात जाण्यास पसंत केलं. मात्र जे राहिले त्यांना राष्ट्रवादीची पूर्वीसारखी चमक दाखवन्यात अपयश येतोय. या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी सपशेल फेल झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे कळंब तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढार्यांना आत्मचिंतनाची गरज आहे, असेच म्हणावे लागेल.
राणा पाटील गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात सुरंग लागली आहे. अनेक गावात नावाला राष्ट्रवादी उरली आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी आत्तापासून कामाला लागावं लागणार आहे, अन्यथा आजच्या सारखे निकाल पुढच्या निकालात देखील पाहायला मिळाले तर नवल वाटून घेऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काँग्रेस पक्षाला देखील कात टाकण्याची गरज आहे. कारण दोन्ही काँग्रेसची अवस्था दिवसंदिवस वाईट होत चालली आहे.
जिल्ह्यात चार पैकी एकही आमदार राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा निवडून आलेला नाही. तेच गेल्या विधानसभेचा निकाल पाहिला तर जिल्ह्यात राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1 आणि शिवसेना 1 अशी संख्या होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला भोपळा फोडता आला नाही. तशीच गत त्यानंतरच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील झालीय. त्यामुळे जिल्ह्यात अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर दोन्ही काँग्रेसला पळावं लागेल एवढं मात्र नक्की.