अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – गरज पडल्यास अक्कलकोट शहर आणि तालुक्यासाठी कोव्हिडं डेडिकेटेड हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन बेडची संख्या वाढवू,असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रविवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या हेल्थ सेंटरचे उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणची परिस्थिती पाहण्यासाठी थेट त्यांनी कोव्हिडं रुग्णांशी चर्चा केली. त्यांची आस्थेने विचारपूस केली त्यांना काही अडचण आहे का याबद्दल ही
विचारणा केली.
या ठिकाणची लाईट,पाणी, ऑक्सिजन व्यवस्था, स्वच्छता, भोजन व्यवस्था यासंदर्भातील चौकशी करून रुग्णांना धीर दिला.थेट कोव्हिडं वार्डात त्यांनी प्रवेश करून रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला.याठिकाणी लागणाऱ्या सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तालुक्यातील वैद्यकीय यंत्रणा करत आहे. त्यांच्यासोबत मी स्वतः आहे आपण घाबरून जाऊ नये, भयभीत होऊ नये,काळजी करू नये अशाप्रकारचे अभिवचन आमदार कल्याणशेट्टी यांनी रुग्णांना दिले.
या हॉस्पिटलमध्ये सध्या एकाच दिवसात अकरा रुग्ण दाखल झाले आहेत त्यांना ऑक्सिजनची कमतरता आहे.परंतु सध्या त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, असेही त्यांनी सांगितले.यानंतर अक्कलकोट येथील शासकीय निवासी शाळा येथे सीसीसी सेंटर आहे. त्या ठिकाणीही ११२ पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. त्या सेंटरला ही त्यांनी भेट दिली. आणि त्या ठिकाणच्या व्यवस्थेची पाहणी करून अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी त्यांच्यासोबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे व त्यांचा स्टाफ होता. सध्या तरी या ठिकाणी ११२ रुग्ण आहेत, दोनशे बेडची क्षमता या सेंटरची आहे भविष्यकाळात जर रुग्णांची संख्या वाढली तर सीसीसी सेंटर आणखीन एक उभारण्याचा प्रयत्न आपण निश्चित करू, असे त्यांनी सांगितले.
★ नागरिकांनी स्वतःहून काळजी घ्यावी
कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तेव्हा नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.आमच्या पातळीवर तालुक्यातील रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत आहोतच पण मास्क,सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा वापर नागरिकांनी करावा.
– सचिन कल्याणशेट्टी,आमदार