आज महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माझी कविता समर्पित….
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
चिमुकल्या पावलांच्या ठशांनी
आई -बाबांचे घर भरून निघते.
हसण्या- बागडण्याने
अवघं अंगण सजून निघते.
मायेच्या शब्दांनी, रुसव्या -फुगव्याने भावाचे मन ओथंबून येते.
ती लाडकी लेक असते.
आईचे वात्सल्य,
बापाचं काळीज,
भावाची माया,
बहिणीची छाया,
या सर्वांना सोडून
जी अनोळखी कुटुंबात
जाण्यास सहज तयार होते
दोन कुटुंबाना एकत्र जोडणारी
नात्यांना प्रेमाने घट्ट गुंफणारी
जी नाजूक विण असते ना
ती स्त्री असते
अनोळखी व्यक्तीला जीवनात स्थान देऊन त्याला पती परमेश्वर मानते
हक्काचा विचार डावीकडे सारून
जी कर्तव्याला प्राधान्य देते ना ती स्त्री असते.
एवढचं काय….
भांगात सिंदूर, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात चुडे, बोटात जोडवे, जी आपल्या पतीच्या नावाने घालते ना ती स्त्री असते.
लहानपणी आई – वडिलांसाठी, तरुणपणी पतीसाठी व नंतर मुलांसाठी जी जगते
स्वतःच अस्तित्व केवळ कुटुंबासाठी असे मानून रात्रंदिवस जी झटत असते ना ती स्त्री असते.
मला, माझं या गोष्टी विसरून
सर्वांसाठी सतत धडपडत असते स्वतःच्या आवडीनिवडी विसरून ,
दुसऱ्यांच्या आवडीनिवडी जपण्यात जी धन्यता मानते ना ती स्त्री असते.
मुलगी, बहिण, आत्या, वहिनी, पत्नी,सून, काकू, मामी, आई , सासू आणि आजी यासारख्या नात्यांमध्ये सहजपणे प्रवेश करते आणि त्या नात्यांना जिवापाड जपते. अशा विविध नात्यांनी जी सजून निघते ना ती स्त्री असते.
महिला, नारी, भगिनी, ताई, माऊली या विविध नावांनी ओळखली जाते. एक ना अनेक नावांना एकसंध बांधून त्यांना जोपासते.
माया, ममता, प्रेम, जिव्हाळा जिच्या ठायी असते ना ती स्त्री असते .
=====================================================================================
✍✍✍✍✍✍
कवयित्री:-
सौ. ज्ञानेश्वरी शिंदे-नरवडे
सहशिक्षिका – जि.प.प्रा. शाळा, तामलवाडी.