साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा
मराठवाड्यासह धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वकांक्षी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम हाती घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंतजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गतच्या प्राध्यानक्रमाची मर्यादा वाढवून कळंब तालुक्यातील दुधाळवाडी व रामदारा साठवण तलावापर्यंतची कामे यामध्ये समाविष्ट करावीत अशी मागणी कळंब-धाराशिव चे आ. कैलास पाटील यांनी शिवसेना उपनेते मा.मंत्री आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.ज्ञानराज चौगुले यांच्यासमवेत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे व राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतजी पाटील यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन दि. २१ जानेवारी २०२१ रोजी ना.जयंतजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. धाराशिव च्या शिवसेना लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार दुधाळवाडी व रामदारा तलावापर्यंतच्या कामांना लवकरच सुरुवात होणार असून सिंचनाच्या दिशेने एक गतिशील शाश्वत पाऊल पडणार असून जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात भरीव अशी वाढ होणार आहे.
या प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील इतर भागातून २३.६६ अ.घ.फू. पाणी धाराशिव (उस्मानाबाद) व बीड जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे १,१४,७३१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यासाठी २ व बीड जिल्ह्यासाठी १ आशा एकूण ३ उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे.
विधानसभेच्या अर्थ संकल्पिय अधिवेशनात पुरवणी मागण्यावरील चर्चेत बोलताना मा.कैलास पाटील यांनी या प्रकल्पाच्या बाबतीत मुद्दा उपस्थित करून मागच्या सरकारच्या काळात काही कामांना स्थगिती दिल्याने मंजूर झालेल्या निधींपैकी तब्बल सव्वाशे कोटी निधी अखर्चित राहिला होता. भाजपा सरकारच्या काळात लावलेल्या स्थगिती शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने उठविल्यामुळे नक्कीच या प्रकल्पास गती मिळणार आहे.
कृष्णा खोऱ्यांच्या उर्ध्व भीमा उपखोऱ्यात धाराशिव(उस्मानाबाद), परंडा, भुम, वाशी, तुळजापुर व कळंब या तालुक्यांचा काही भाग यामध्ये समाविष्ट आहे. मराठवाडा कृष्णा प्रकल्पाच्या प्राधान्यक्रमात सोनगिरी वितरण कुंडापर्यंत ठराविक लांबी समाविष्ट होती आता त्याची लांबी वाढणार आहे. सिंचन प्रकल्प उपसासिंचन योजना क्रमांक १ अंतर्गत टप्पा क्रमांक पाच अंतर्गत दुधाळवाडी साठवण तलावापर्यंत होणार आहे. त्यामुळे त्या भागातील जवळपास १४ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. शिवाय उपसा सिंचन क्रमांक २ अंतर्गत टप्पा क्रमांक पाच रामदरा साठवण तलावपर्यंतची कामे प्राधान्याने हाती घेतलेली आहेत. आता ही कामे प्राधान्यक्रमात आल्याने या प्रकल्पाला लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत असे यावेळी मा. आ. कैलास पाटील यांनी सांगितले.
या प्रकल्पामुळे धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्यातील सिंचनाच्या क्षेत्रात नक्कीच वाढ होऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व बळीराजा समृद्ध होण्यासाठी चालना मिळणार आहे.
या प्रस्तावास मंजुरी दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा. ना. उध्दवजी ठाकरे साहेब , अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार, युवासेना प्रमुख तथा पर्यटन मंत्री मा.ना. आदित्यजी ठाकरे व जलसंपदा मंत्री ना. जयंतजी पाटील व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्यातील बळीराजाच्या वतीने आ. कैलास पाटील व खा. ओमराजे निंबाळकर यांनी आभार मानले.
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे सकारात्मक – आ. कैलास पाटील
धारशिवचे वैद्यकीय महाविद्यालय, औद्योगिक वसाहतींचा विकास तसेच तुळजापूर तीर्थक्षेत्ररेल्वेने जोडणे आदी प्रश्न सोडविण्यासाठीमा. मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे आ. कैलास पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.