दरेकर यांनी बार्शीत घरी जाऊन केला सन्मान
पंढरपूर दि. ५ डिसेंबर-
जागतिक पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळालेला पुरस्कार व सन्मान हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाने मान उंचावणारा आहे. इतर शिक्षकांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशी त्यांची कामगिरी आहे, असे गौरवोद्गार विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज काढले.
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा जागतिक स्तरावरील ७ कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक श्री. डिसले यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्त विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी बार्शी येथे रणजीतसिंह डिसले यांच्या घरी जाऊन त्यांच्यासह कुटुंबीयांचा व त्यांच्या आईवडीलांचा सन्मान केला.
यावेळी दरेकर यांनी फोनवरून विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणे करून दिले. फडणवीस आणि पाटील यांनी डिसले यांना त्यांच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेचे शिक्षक अनेक अडचणींना सामोरे जात काम करीत आहेत. परतुं अतिशय प्रतिकुल परिस्थितीत डिसेल यांना मिळालेला जागतिक पुरस्कार हा सर्वच शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारातून इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि काम करावे, असेही दरेकर यांनी सांगितले.
दरेकर यांनी सांगितले कि, डिसले यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करत सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण मिळावे हा ध्यास घेऊन ज्ञानदानाचे काम केल्यामुळे त्यांची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी ‘क्यू-आर’ कोड सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी अवलंब केला.
एक चांगला संदेश डिसले सरांनी दिला.७ कोटींचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यातला ५० टक्के वाटा हा जे अंतिम फेरीमधे शिक्षक आले होते त्यांच्यासाठी जाहिर केला आहे. हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा याला साजेस असं कार्य त्यांनी केले आहे.
आपण विधिमंडळामध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आणण्याची शिफारस सरकारकडे करु असेही त्यांनी सांगितले.
राज्यात नुकत्याच विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक झाल्या. यामध्ये शिक्षक नसलेला व्यक्ती शिक्षक आमदार होतो हेच देशाचे दुर्दैव आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, पंचायत समिती सभापती अनिल डिसले, नगराध्यक्ष असीफ तांबेळी, तालुका अध्यक्ष मदन दराडे आदि मान्यवर उपस्थित होते.