तुळजापूर

तुळजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची खा. ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पाहणी

साईनाथ गवळी,
उस्मानाबाद/तुळजापूर प्रतिनिधी.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने समंध तुळजापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेल्या पिकाला मुकावे लागत आहे. शेतीसह अनेक प्रकारच्या जीवित व वित्त नुकसानीला लोकांना सामोरे जावे लागत आहे. अशातच हवामान खात्याने तर अतिवृष्टी चा इशारा दिला आहे. अशा संकटाच्या काळात जिल्ह्याचे खासदार मा. ओमराजे निंबाळकर हे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी व शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

मुसळधार पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे त्यामुळे गावातील नागरीकांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्व ओढे, नाले, तलाव तुडुंब भरले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे अनेक गावांमध्ये ये जा करण्याचे वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे बहुतांश गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच तालुक्यातील अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचे ही मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी जीवित व वित्त हाणीला लोकांना सामोरे जावे लागते आहे.

आज जिल्ह्याचे खा. ओमराजे निंबाळकर यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन, तालुक्यातील सर्व नुकसान झालेल्या गावांची पाहणी केली. तुळजापूर तालुक्यातील कात्री रोड, अपसिंगा, हंगरगा तुळ, खुदावाडी, कात्री, कामठा, सिंदफळ, देवसिंगा तूळ येथिल शेतातील अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान तसेच जनावरे वाहून गेले प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांला धीर दिला. प्रत्यक्ष चिखलात, पाण्यात उतरून शेतकऱ्यांच्या मदतीला धावल्यामुळे मा. खासदार साहेबांचे सर्व जनतेतून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

खा. मा.ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे सरसकट तात्काळ पंचनामे करण्याचे शेतकऱ्यांना शासनाकडून व विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल या बाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, उपतालुका प्रमुख रोहित चव्हाण, ग्रा. पं. सदस्य अमिरभाई शेख, तहसीलदार सौदागर तांदळे, कृषी सहाय्यक फावडे, स्थानिक शिवसेना पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, तसेच सर्व शेतकरी बांधव, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts