भारत

पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटकात कोरोनाचा हाहाकार सुरु!

मुंबई, महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशाच्या विविध भागात कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी होत असले तरी उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि प. बंगालमध्ये कोरोनाने डोकेदुखी वाढविली आहे. विशेषतः कर्नाटकमध्ये कोरोनाचा लक्षणीय झपाटा दिसून येत आहे.
मार्च महिन्यात जेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली होती, तेव्हा महाराष्ट्र, पंजाब, केरळ, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये संसर्गाची व्याप्ती सर्वाधिक होती. अजूनही वरील राज्यांतले कोरोनाचे संकट कमी झालेले नाही. मात्र ज्या राज्यात संसर्गाचे हे प्रमाण कमी होते; त्या उत्तर प्रदेश, कर्नाटक, प. बंगाल, बिहार या राज्यातील संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढू लागले आहे. उत्तर प्रदेशातील दैनिक रूग्ण संख्या गेल्या काही दिवसांपासून 30 हजारांच्या वर आहे. कर्नाटकात हाच आकडा 35 हजारांच्या पुढे आहे, तर अलीकडेच विधानसभा निवडणुका झालेल्या प. बंगालमध्ये दैनिक रूग्ण संख्या वाढ 20 हजारांच्या समीप गेली आहे.
गेल्या महिनाभरात कोरोनाचे संकट सर्वव्यापी बनले आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये केवळ मार्च महिनाच नव्हे तर एप्रिलमध्येदेखील स्थिती भीषण होती. सुदैवाने दिल्लीमध्ये रूग्ण संख्या घटत चालली आहे. देशाच्या अन्य भागात संकट काही प्रमाणात कमी झाले आहे. अर्थातच त्यामुळे बेसावध राहून चालणार नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक शहरात मागील 10 दिवसांत असंख्य लोकांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात त्याची नुकतीच पुनरावृत्ती झाली आणि बावीस लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी युद्ध पातळीवर काम करणे गरजेचे बनले आहे.

Related posts