भारत

भारतात रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी परवानगी

भारतात तिसऱ्या लसीचा पर्याय उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी केंद्रीय मंत्रालयाने परवानगी दिली आहे. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, औषध नियामक कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला असून मर्यादित वापरासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. रशियाच्या गामालय सेंटरने ही लस विकसित केली आहे.
देशात आणखी पाच लशी परवान्याच्या प्रतीक्षेत
रशियाच्या स्पुटनिक लसीच्या प्रतिबंधित वापरासाठी परवानगी देण्यात आली असली तरी अद्याप याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे भारताच्या करोनाविरोधातील लढ्याला बळ मिळणार आहे. स्पुटनिक लसीचा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासंबंधीची माहिती तपासल्यानंतर ही परवानगी देण्यात आली आहे. कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक लस ९२ टक्के परिणामकारक ठरली असल्याचा तेथील आरोग्य मंत्रालयाने अंतरिम निष्कर्षांत म्हटलं आहे.
सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जात आहे. स्पुटनिक व्ही सोबत भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध होणार आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यं लसींचा पुरवठा होत नसल्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. या निर्णयामुळे लसीच्या पुरवठ्याचा प्रश्न सोडवला जाण्याची आशा आहे.
येत्या ऑक्टोबरपर्यंत किमान पाच लसींना मान्यता मिळण्याची शक्यता
२०२१च्या तिसऱ्या तिमाहीत आणखी पाच लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यात स्पुटनिक ५ ही लस रेड्डीज लॅबोरेटरीजच्या मदतीने उत्पादित केली जाणार असून जॉन्सन अँड जॉन्सनची लस बायॉलॉजिकल इ ही कंपनी तयार करणार आहे. सिरम इंडिया ही कंपनी नोव्हाव्हॅक्स ही लस उत्पादित करणार आहे. झायडस कॅडिला कंपना ‘झायकोव्ह- डी ’ लस तयार करीत आहे. भारत बायोटेक नाकावाटे देण्याची लस विकसित करीत आहे. या लसींना परवानगी देताना परिणामकारकता व सुरक्षितता या दोन घटकांवर सरकार लक्ष केंद्रित करीत आहे.
रेड्डी लॅबोरेटरीज व्यतिरिक्त हेटरो बायोफार्मा, ग्लँड फार्मा, स्टेलिस बायोफार्मा, विक्रो बायोटेक या कंपन्या स्पुटनिक पाच लसीचे उत्पादन करणार असून ८५० दशलक्ष मात्रांची निर्मिती क्षमता निर्माण होणार आहे. स्पुटनिक लस प्रत्यक्ष जूनमध्ये, जॉन्सन अँड जॉन्सन व झायडस कॅडिला यांच्या लशी ऑगस्टमध्ये, नोव्हाव्हॅक्स सप्टेंबरमध्ये, नाकात टाकण्याची लस ऑक्टोबरमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे.

Related posts