कविता 

बेफिकीरी . . . !

●कवी:-
श्री. तुषार विश्वनाथराव सूत्रावे (सर)
सहशिक्षक-श्री.तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर.

हुंदके दाटले आहेत भविष्यात दूर कुठेतरी
माणसे विसारली माणुसकीचा सूर कुठेतरी

स्मशाने हळूच वेशीच्या आत येऊन वसली
गर्विष्ठ चेहऱ्याचे पालटून गेले नूर कुठेतरी

श्रद्धेची कवाडे आदळली आहेत तोंडावरती
ओसरला आंधळ्या भक्तीचा पूर कुठेतरी

लयास गेली दया करुणा ही बेफिकीर वृत्ती
नयनी कुणाच्या वसली का हूर हूर कुठेतरी

कर गुंतले आकाशी सुक्ष्मापुढे गुडघे टेकती
स्वार्थी मेंदूचा अहंकार आहे झाला चूर कुठेतरी

जात धर्म पंथा ची लक्तरे टांगली वेशीवरती
तरी धर्मामांध लपून आहे बसला मग्रूर कुठेतरी

युगे सत्वर सारी पायावर झिजून गेली
हरवल्या पाऊलखुणा वाट पुसुन गेली

आदर्श बुरखे आसमंती पांघरशील किती
रक्ताची माय उंबऱ्यात उपाशी मरून गेली

वितळून गेल्यात स्वार्थी सावल्या कातरवेळी
शोध जरा मनाची आर्द्रता कुठे उडून गेली.

क्षितीज बुडाले कभिन्न काळोखात सारी
प्रकाशकिरणे आंधळ्या डोळ्यात विझून गेली

जीर्ण त्वचेच्या रांगोळीत गर्व दाटला किती
बघ शाश्वत कातळात ही काया निजून गेली…!

Related posts