आज एप्रिल फूल्स डे निमित्त सोशल नेटवर्किंगवर हॅशटॅगचा पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून या दिवशी मोठ्या राजकीय पक्षांकडून विरोधी पक्षातील नेत्यांनी केलेली वक्तव्य आणि दावे कसे खोटे होते हे दाखवण्यासाठी हॅशटॅग वापरले जात असल्याचा ट्रेण्ड दिसत आहे. यंदाचं वर्षही याला अफवाद ठरलेलं नाही. प्रामुख्याने भाजपा आणि काँग्रेसकडून एकमेकांच्या मोठ्या नेत्यांच्या नावाने हॅशटॅग तयार करुन ट्रोलिंग करणारे मिम्स आणि ट्विट केले जात आहेत. असं असतानाच दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आजच्या एप्रिल फूल्स डे निमित्त थेट राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधक शब्दात टीका केलीय.
जलयुक्त शिवार योजनेच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीसांवर निशाणा साधलाय. “क्लीनचिट मुख्यमंत्री अशी ओळख मिळवलेल्यांची जुनी सवय विरोधी पक्षनेते झाल्यावरही सुटलेली दिसत नाही,” अशा कॅप्शनसहीत राष्ट्रवादीने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याच्या कॅगच्या अहवालाच्या बातम्यांचं कोलाज शेअर केलं आहे. हा फोटो शेअर करताना मनघडण म्हणजेच मनाला वाटेल त्या गोष्टी सांगणं या अर्थाच्या हिंदी शब्दाशी मेळ साधणारा #मनफडण_कहानियाँ हा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे. त्याचप्रमाणे #क्लीनचिटर्स, #FekuDiwas, #GlobalFekuDay हे हॅशटॅगही वापरण्यात आलेत. तसेच या फोटोवर, “अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी स्वत:लाच क्लीन चीट देतोय”, असं वाक्यही लिहिलेलं आहे.
previous post