प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब तालुक्यातील प्रत्येक रेशनकार्डमधील लाभार्थ्यांचे शंभर टक्के आधार लिंकिंग आणि किमान एक मोबाईल क्रमांक देण्याच्या उद्दीष्टाने कळंब शहरातील तहसील कार्यालयात मोहीम राबविण्यात येत आहे.
रेशनकार्डधारकांनी येत्या 31 जानेवारीपर्यंत रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक करून घेणे बंधनकारक असून, आधार लिंक न केल्यास लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून धान्य मिळणार नाही, अशी माहिती नायब तहसीलदार परवीन पठाण यांनी दिली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक आणि आधार लिंक पूर्ण करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आहेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार, मोबाईल लिंक करणे आवश्यक आहे. याकरिता रेशन दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ईकेवायसी व मोबाईल लिंकिंग सुविधेचा वापर करून आधार व मोबाईल क्रमांक लिंकचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे.
याकरिता 31 जानेवारीपूर्वी प्रत्येक रेशनकार्डमधील लाभार्थ्यांचे शंभर टक्के आधार लिंकिंग आणि किमान एक मोबाईल क्रमांक देण्याच्या उद्दीष्टाने कळंब तहसीलच्या वतीने कार्यालयात मोहीम राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे रास्त भाव दुकानदारांमार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांचा आधार व मोबाईल क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. याबाबत आधार लिंक न झालेल्या लाभार्थ्यांची दुकाननिहाय यादी तयार करण्यात आली आहे.
31 जानेवारीपूर्वी या लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक लिंक करण्याचे निर्देश 11 परिमंडळ कार्यालयांना देण्यात आले आहेत.
केवायसी पडताळणी व मोबाईल लिंक सुविधा प्रत्येक रास्त भाव धान्य दुकानात आणि संबंधित परिमंडळ कार्यालयात उपलब्ध आहे. याबाबत सर्व परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांच्यामार्फत रास्त भाव दुकानदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
लाभार्थ्यांना सूचना
-रेशनकार्डमध्ये नोंद असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊन संबंधित रास्त भाव धान्य दुकानात जाऊन केवायसी पडताळणी करावी
-संबंधित लाभार्थी यांनी वैयक्तिकरीत्या दुकानात जाऊन आधारकार्ड व अंगठ्याचा ठसा ई-पॉस मशिनवर द्यावयाचा आहे.
-कुटुंबातील किमान एका सदस्याचा मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.
परवीन पठाण,
नायब तहसीलदार पुरवठा विभाग