तुझी सर येत नाही
हिरे ,माणिक, मोत्याला…
नको कमी लेखू कधी
अनमोल जीवनाला,
कितीतरी नशिबानं
स्त्री जन्म हा लाभला
तुझी सर येत…
सूर्यकिरणाचे तेज
लोटांगण चरणाला,
टाक धीराने पाऊल
दूर सार धटिंगणाला
तुझी सर येत…
राम,श्रीकृष्ण,अर्जून
तुझ्या कुशीत जन्मला,
छत्रपती शिवशंभू
शूर तूच घडवला
तुझी सर येत…
जगी तोड नाही तुझ्या
जाण,जाणिव जिज्ञासेला,
लक्ष्मी,अहिल्या जिजाच्या
रणांगणी धाडसाला
तुझी सर येत…
कल्पनेची ही भरारी
गवसणी आकाशाला,
संशोधन, वैद्यकीय
मान तेथेही तुजला
तुझी सर येत…
तुझ्यामुळेच पूर्तता
तुजविन आर्ततेला,
पुरूषार्थ वांझ येथे
तुझ्यावाचून पडला
तुझी सर येत…
===================================================================================================
कवयित्री:-
सौ. ज्ञानेश्वरी शिंदे-नरवडे
सहशिक्षिका – जि.प.प्रा. शाळा, तामलवाडी.