महाराष्ट्र

तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार

देवेंद्र फडणवीस यांनीच पहिल्यांदा सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. आणि त्यांनीच पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आरोपांची फाईल अजित पवार यांना दाखवली होती. त्यांनी घरी बोलवून ही फाईल अजित पवारांना दाखवली आणि हे वक्तव्य मी करत नसून अजित पवार यांनी जाहीर सभेतून सांगितलं आहे. त्यामुळे फडणवीस यांनी ईडी, सीबीआयचा वापर करून पक्ष, घरं फोडल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. आज (8 नोव्हेंबर) अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या सनसनाटी दाव्यानंतर महायुतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ही कौतुकाची गोष्ट आहे का?

ईडीच्या दबावानेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपसोबत गेल्याचा आरोप सातत्याने होत असतानाच आज छगन भुजबळ यांनी आपल्या दाव्यातून एक प्रकारे होणाऱ्या आरोपांना पुष्टी दिल्याने महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर प्रहार करत त्यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे अशी मागणी केली. त्या म्हणाल्या की दोन पक्ष फोडून आलो म्हणून फडणवीस जाहीरपणे सांगतात, ही कौतुकाची गोष्ट आहे का? अशा खोचक टोला सुद्धा त्यांनी लगावला.

ऑन कॅमेरा तुमच्या चर्चेला तयार

दरम्यान, फडणवीस यांच्याकडून होणाऱ्या आरोपाला सुद्धा सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, तुम्ही म्हणाल ती वेळ, ते म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, ऑन कॅमेरा चर्चेला तयार असल्याचे आव्हान सुद्धा सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. फडणवीस यांनी सुप्रिया सुळे या फेक नरेटिव्हच्या व्यवस्थापक असल्याचा आरोप केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांना जाहीर आव्हान देत चर्चेसाठी बोलावलं आहे. फडणवीस केलेल्या बटेंगे तो कटेंगे ट्विटवरून सुद्धा त्यांनी हल्लाबोल केला. हे धक्कादायक असल्याचे त्या म्हणाल्या.  दरम्यान, राहुल गांधींच्या हातामधील संविधानावरून फडणवीस यांनी लाल रंग कशासाठी अशी विचारणा केली होती. त्याला सुद्धा सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधींच्या हातात असलेल्या संविधानाला सुद्धा फडणवीस यांच्याकडून विरोध होत आहे. मात्र, आम्ही हातातून संविधान सोडणार नाही. आम्हाला त्याचा अभिमानच असून निवडणुकीमध्ये संविधान घेऊनच आम्ही उभे राहणार आहोत. हवे तर त्यांनी आरोप करावेत, अटक करावी असे आव्हान सुद्धा सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.

Related posts