धाराशिव : शिवसेना पक्ष असाच सहज फुटला नाही एकनाथ शिंदे यांचा एक जवळचा माणूस ईडीने ताब्यात घेतला त्यावेळी भाजपातुन शिंदे यांना दाब दिला जात होता. शिवसेना पक्ष फोडून येतो की जेलात जातो, त्यामुळे पक्ष फोडून एकनाथ शिंदेंसह हे आमदार गेले. तसेच अजित पवार यांचा 70 हजार करोडचा घोटाळा काढला अन् अजित पवार सातव्याच दिवशी यांच्या मंत्रिमंडळात दाखल झाल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं. भाजप हे कटकारस्थानी असून महाराष्ट्रातील राजकारण नासवून टाकायचे काम भाजपने केलय. शेतकऱ्यांना देशोधडीला लावलय, अशी घणाघाती टिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली. मविआचे ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांमध्येही मुख्यमंत्री शिदेंच्या बंडावरुन शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास उरले असून दिवाळीचे फटाकेही फुटले आहेत. त्यामुळे, निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांच्या प्रचारतोफा धडाडायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदारसंघात जोमाने प्रचार सुरू केला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत आहे. त्यातच, शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशाही चुरशीच्या लढती आहेत. त्यामुळे, पुढील काही दिवसांत राजकीय चिखलफेक पाहायला मिळेल. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गुवाहटी दौऱ्यावरुन हल्लाबोल केला जाईल. शिवसेना युबीटी पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदेंचा जवळचा माणूस ईडीने ताब्यात घेऊन शिवसेना पक्ष फुटला, असा गौप्यस्फोटच ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे.
गद्दारीत सहभागी झालो नाही – ओमराजे
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे कैलास घाडगे पाटील यांनी त्यांच्या मूळ गावी कळंब तालुक्यातील देवधानोरा येथे आज प्रचाराचा नारळ फोडला. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मिळत नसलेला भाव. दूध उत्पादक शेईतकऱ्यांच्या अनुदानाची घोषणा मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. गद्दारीत सहभागी झालो नाही म्हणून अडवलेली कामं हे प्रश्न घेऊन जनतेत जाणार असल्यास कैलास पाटील म्हणाले.