सोलापूर : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाच दिवस लॉकडाऊन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, या दोन दिवसांत शहर परिसरातील अत्यावश्यक सेवेत मोडणारी सर्व दुकाने चालू राहतील. मात्र, सर्वसामान्य व्यक्तींना शहरात फिरता येणार नाही. विनाकारण फिरणार्या व्यक्तींवर संचारबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद केले जाणार आहेत. शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदीचा अंमल सुरू झाला होता. लोकांनी कारण असल्याशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.
संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरात चौकाचौकांत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. योग्य कारण असेल त्यांनाच सोडण्यात येणार आहे; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले. सोमवारी सकाळी सातपर्यंत संचारबंदी असल्याने नागरिकांनी घरीच सुरक्षित राहावे. शनिवार व रविवार संचारबंदीमध्ये सोलापूर शहर परिसरात अत्यावश्यक सेवेमध्ये मुभा देण्यात आलेल्या दुकानदार, रिक्षाचालक, डिलिव्हरी बॉय, कारखान्यातील कामगारांना कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. संबंधित अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणार्या मालक आणि कर्मचार्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतल्याचे प्रमाणपत्र आपल्या दुकानात लावणे बंधनकारक असणार आहे. निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर त्यांच्यावर शासनाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
शहरात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त
शहरात संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी व रविवारी दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नियम मोडणार्या नागरिकांच्या गाड्या जप्त करण्यात येतील, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.
संचारबंदीच्या काळात पोलिसांनी पकडलेल्या गाड्या या जप्त करण्यात येतील. शहरात नाकाबंदी करण्यात येईल. शहरातील 7 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कडक बंदोबस्त लावण्यात येईल. त्यामुळे शहरवासीयांनी नियम पाळूनच गाड्या चालवाव्यात. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी चाचणी आवश्यक
संचारबंदीच्या काळात शनिवार व रविवार या दोन दिवसांत अत्यावश्यक सुविधा सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. संचारबंदीत ज्यांना मुभा देण्यात आली आहे त्या व्यावसायिकांची 48 तासांच्या आतील कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल आवश्यक आहे. असा अहवाल असणार्यांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सुविधा पुरविणार्या ज्या विक्रेत्याकडे कोरोना तपासणीचा अहवाल नसेल त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकारांना दिली.